बीड शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखले जाते. या शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक मंदिरं आणि शिल्पं पहायला मिळतात.
बीड शहरापासून अवघ्या काही अंतरावर ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर आहे. या मंदिराला 1 हजार वर्षांपासूनचा इतिहास आहे. उन्हाळी पर्यटनासाठी हे उत्तम धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे.
चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने हे मंदिर 11 ते 12 शतकात बांधले असावे, असं इतिहासकार सांगतात. त्यामुळे 1 हजार वर्षांहून अधिक जुने असे हे ऐतिहासिक मंदिर आहे.
कंकालेश्वर मंदिर बांधण्यासाठी परिसरातीलच दगडांचा वापर करण्यात आला. त्यामुळे मंदिर परिसरात खड्डा निर्माण झाला आणि त्याला तलावाचा आकार देण्यात आला आहे. त्यामुळे हे मंदिर कृत्रिमरित्या जलकुंडात उभे आहे.
कंकालेश्वर मंदिर हे स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना मानलं जातं. याच्यावर विविध दगडी शिल्पं कोरण्यात आली आहेत.
कंकालेश्वर मंदिर बीड शहरापासून केवळ 2 किलोमीटर अंतरावर आहे. इथं जाण्यासाठी बस आणि खासगी वाहतुकीच्या सेवाही उपलब्ध आहेत. शहर बस स्थानकापासून केवळ 30 रुपयांत रिक्षानेही आपण इथं पोहोचू शकता.
कंकालेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी कुठलंही बुकिंग अथवा तिकीट नाही. मंदिरामध्ये रोज प्रसाद असतो तर महाशिवरात्री, श्रावण महिन्यात महोत्सवासह महाप्रसाद केला जातो.
कंकालेश्वर मंदिर हे सकाळी पाचच्या सुमारास उघडते. यावेळी महाआरती आणि पूजा केली जाते. तर संध्याकाळी मंदिर 9 वा. सुमारास बंद होते.
संध्याकाळच्या सुमारास देखील या ठिकाणी मोठ्या आरतीचे आयोजन केले जाते. आरतीसाठी अनेक भाविक मंदिरात आवर्जून येत असतात.
मंदिर परिसरात भक्तनिवास उपलब्ध नाही. मात्र बीड शहरातील बस स्थानक परिसरामध्ये कमी दरामध्ये लॉजिंग उपलब्ध आहेत.
कंकालेश्वर मंदिराच्या जवळ पर्यटनासाठी इतरही ठिकाणे आहेत. मंदिरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर दीपमाळ आणि खंडोबाचे मंदिर आहे.