महाराष्ट्रात अनेक पुरातन आणि धार्मिक महत्त्व असणारी मंदिरे आहेत. या मंदिरांना मोठा ऐतिहासिक वारसाही आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामध्ये पुरुषोत्तम पुरी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. गोदावरी नदीच्या काठावर भारतातील एकमेव पुरुषोत्तमाचे मंदिर येथे आहे.
देशातील एकमेव असलेल्या या मंदिरात अधिक मासानिमित्त एक महिना यात्रा भरत असते. यावेळी देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.
सातशे वर्षांपूर्वी राजा रामदेवराव यांनी पुरुषोत्तमाचे मंदिर बांधले होते. आता या पुरातन मंदिराची पडझड होत असल्याने जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारच्याीने या जीर्णोद्धारासाठी 54 कोटी 56 लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रयत्न केले. आता या कामाला सुरुवात झाली आहे.
जुलै महिन्यात अधिक मास सुरू होणार आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी भगवान पुरुषोत्तमाची मूर्ती जुन्या मंदिरात हलविण्यात आली आहे.
पुरुषोत्तमाच्या मूर्तीच्या समोरच महादेवाची पिंड आहे. मूर्ती समोर असलेली महादेवाची पिंडी हलविली असता पिंडीखाली सोन्याचे कासव आढळून आले आहे.
सोन्याचे हे कासव सातशे वर्षांपूर्वी मंदिर निर्माण करतेवेळी पिंडीखाली ठेवले असावे, असे विश्वस्त विजय गोळेकर यांनी सांगितले आहे.
सोन्याचे कासव मंदिराच्या विश्वस्तांनी ताब्यात घेतले असून ते जवळपास एक तोळ्याचे असल्याचे सांगण्यात आले. भाविक कासवाची मनोभावाने पूजा करत असून नवीन मंदिर उभारणीनंतर ते पुन्हा पूर्ववत ठेवण्यात येणार आहे.