कोल्हापूर, 7 डिसेंबर : दत्त जयंती आज (7 डिसेंबर) सर्वत्र साजरी होत आहे. कोल्हापूरातही अनेक प्राचीन आणि भव्य दत्त मंदिर आहेत. यापैकी फुलेवाडीतील मंदिराचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंध आहे.
दोन मजली असलेले मंदिर हे मुख्य मंदिर आणि सभागृह अशा स्वरूपाचे आहे. समोर गेटबाहेर दोन्ही बाजूला पार आणि गेटवर सिंहांची प्रतिकृती आहे. मंदिराच्या समोरच कामदार दत्तू राऊत यांची अस्थी समाधी आहे.
1929 साली कोल्हापुरातील मध्यवर्ती ठिकाणी सर लेस्ली विल्सन या इंग्रज अधिकाऱ्याचा पुतळा उभारला गेला होता. शुभ्र संगमरवरी दगडात घडवलेला 15 फूट उंचीचा हा पुतळा होता. कोल्हापुरातील स्वातंत्र्य सैनिकांनी विल्सन यांचा पुतळा तोडला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोल्हापूरमधील भंगार वस्तुंचे व्यापारी मेहता यांनी विल्सन यांचा हा पुतळा खरेदी केला. ( फोटो सौजन्य : कोल्हापूरचे शिलेदार, लेखक शरद तांबट)
मेहता यांनी राजस्थानहून कारगीर बोलावून या विल्सन यांच्या पुतळ्याच्या संगमरवरी दगडापासून सुबक अशी दत्त मूर्ती बनवली.दत्त मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली
विल्सनचा पुतळा होता त्या जागेवर भालजी पेंढारकर यांच्या पुढाकारानं 1945 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात आला.