गायत्री मंत्र - ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्।
गायत्री मंत्राचा अर्थ - त्या सर्वरक्षक, प्राणांहून प्रिय, दुःखनाशक, सुखस्वरूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, देवस्वरूप परमात्म्याला आपण अंतःकरणात धारण करू या. तो परमात्मा आमच्या बुद्धीला सन्मार्गासाठी प्रेरित करू दे.
विद्यार्थ्यांसाठी लाभदायक - विद्यार्थ्यांसाठी गायत्री मंत्र खूप लाभदायक मानला जातो. एखादा विद्यार्थी दररोज या मंत्राचा 108 वेळा जप करत असेल, तर त्याला कोणत्याही प्रकारची विद्या प्राप्त करण्यात कोणतीही समस्या येत नाही. असंही मानलं जातं, की गायत्री मंत्राच्या जपामुळे व्यक्तीचं तेज वाढतं. डोळ्यांचं तेज वाढतं, क्रोध शांत होतो आणि ज्ञानाची प्राप्ती होते.
व्यापार किंवा नोकरीत प्रगतीसाठी - एखाद्या व्यक्तीला व्यापारात किंवा नोकरीत अपयश मिळत असेल किंवा प्रगतीत वारंवार अडथळे येत असतील, तर अशा व्यक्तीने दररोज गायत्री मंत्राचा जप करावा. गायत्री मंत्राचा जप केल्यानं अशा व्यक्तींना नक्कीच लाभ मिळू शकतो.
अपत्यप्राप्तीसाठी - एखाद्या दाम्पत्याला बरीच इच्छा असूनही अपत्यप्राप्ती होत नसेल किंवा त्यात काही अडचणी असतील, तर अशा वेळी पती-पत्नी दोघांनीही मिळून एक महिनाभर दररोज सूर्योदयापूर्वी 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा. जप करताना अपत्यप्राप्तीची इच्छा मनात असावी. असं केल्याने या दाम्पत्याला लवकर अपत्य होण्यास मदत होऊ शकेल.
गायत्री मंत्राच्या जपामुळे एवढे लाभ होत असल्याने गायत्री मंत्राला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचं आणि आदराचं स्थान प्राप्त झालं आहे. कोणीही जप करण्यापूर्वी आपले गुरुजी किंवा या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन घेऊन मगच जप करण्यास सुरुवात करणं अधिक श्रेयस्कर ठरतं. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)