हिंदू धर्मामध्ये अधिकमासला खूप महत्व असून भगवान विष्णूला समर्पित असणारा हा महिना दर तीन वर्षांनी येतो. यंदा तब्बल 19 वर्षांनी हा योगायोग घडला असून अधिक मास यंदा श्रावण महिन्यात आला आहे. अधिकमासमुळे यावर्षी श्रावणाचे महत्व अधिकच वाढले असून या दरम्यान पूजा अर्चाला खूप महत्व दिले जाते.
18 जुलै पासून अधिकमास सुरु झाला असून 16 ऑगस्ट पर्यंत हा चालणार आहे. तेव्हा याकाळात तुम्ही सोमवारी भगवान विष्णूसोबत भगवान शंकराची पूजा केल्यास तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतील.
पंडित मनोज शुक्ल यांनी सांगितले की, 'ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह आणि नक्षत्रांची हालचाल स्थिती एकत्र होत असते. तीन वर्षांच्या कालावधीत, हा कालावधी 12 महिन्यांऐवजी एक पूर्ण महिना होतो आणि 13 महिन्यांचा होतो. हा 13वा महिना अधिकमास म्हणून ओळखला जातो.
अधिकमासचे पूजन करायला कोणी नसताना ते भगवान विष्णूच्या आश्रयाला गेले आणि म्हणाले की लोक मला मलमास नावाने हाक मारतात, याचे मला खूप वाईट वाटते. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला त्याचे नाव दिले आणि सांगितले की आजपासून लोक तुला पुरुषोत्तम मास नावाने ओळखतील. या पुरुषोत्तम मासात जे कोणी माझी उपासना करतील, उपवास करतील, जप करतील, नियमांचे पालन करतील, त्यांना माझ्या दारी स्थान मिळेल आणि त्यांच्यावर मी प्रसन्न होईन. यागोष्टीचे वर्णन धार्मिक ग्रंथांमध्ये केलेले आहे.
पंडित मनोज शुक्ल पुढे म्हणाले की, या वेळी श्रावण महिना पुरुषोत्तम महिन्याच्या रूपाने आला असून, गेल्या 19 वर्षांनंतर असा योगायोग जुळून आला आहे. हा महिना भगवान शंकर आणि त्यांच्या कुटुंबाला समर्पित असतो. यादरम्यान भगवान शिव परिवाराची विशेष पूजा केली जाते. अशास्थितीत भगवान विष्णूला समर्पित पुरुषोत्तम मासाचे विशेष महत्त्व आहे. लोकांनी भगवान शंकरासह भगवान विष्णूची यथाशक्ती पूजा करावी.