चंद्रकांत फुंदे, पुणे, 15 एप्रिल: राज्यभरात अनेक ठिकाणी रेमडिसिव्हीर इंजेक्शन (Remdesivir Injection) चा तुटवडा असल्याच्या बातम्या गेले काही दिवस समोर येत होत्या. दरम्यान आता ही समस्या पुण्यातही निर्माण झाली आहे.
याविरोधात कोरोना रुग्णांच्या (Corona Patients) नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रेमडिसिव्हीर मिळत (Remdesivir Injection Shortage in Pune) नाही म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
कोरोना रुग्णांच्या या नातेवाईकांनी पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयाबाबत ही समस्या मांडली आहे, त्यांनी असे म्हटले आहे की गेले तीन दिवस ससूनमध्ये रेमडिसिव्हीर उपलब्ध नाही आहे. या समस्येवरून रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाल्याचं पाहायला मिळालं.
कोरोना रुग्णांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाले असून याठिकाणी एकच गोंधळ उडाला आहे. राज्यात बुधवारी रात्रीपासून कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू झाली आहे, असे असूनही हे सर्व कोरोना रुग्णांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील मार्गावर एकत्र आले आहेत.
काहीवेळापूर्वी या नातेवाईकांनी रास्तारोको करण्याचाही प्रयत्न केला.
रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याने सामान्यांना हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचा आरोप या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
रेमडिसिव्हीरच्या तुटवड्यामुळे पुणेकरांमध्ये संताप पाहायला मिळाला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यामध्ये लक्ष घालण्याची मागणी आंदोलनकर्ते करत आहेत.
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत कोरोना रुग्णांचे नातेवाईक आंदोलन करत आहेत. लवकरच यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा या आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे
राज्यात काल रात्रीपासून संचारबंदी आदेश लागू असला तरी पुण्यात यापूर्वीच त्याची अंमलबजावणी सुरू झाली होती. दिवसा जमावबंदी आणि संध्याकाळी सहापासून ते सकाळी सात पर्यंत संचारबंदी लागू आहे. आता देखील तीच परिस्थिती आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ही संचारबंदी 14 एप्रिल 2021 रात्रीपासून सुरू झाली आहे. अशावेळी नागरिकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा सरकारकडून व्यक्त केली जात आहे, मात्र रेमडिसिव्हीरचा काळाबाजार, ऑक्सिजनचा तुटवडा, बेड्स उपलब्ध नसणे इ. सर्व समस्यांमुळे नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळतो आहे. सरकार यावर काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.