पुणे, 30 जून : ब्रम्हांडामध्ये खोल अवकाशात दडलेल्या कृष्ण विवरांतील अतिशय कमी वारंवारितेच्या गुरूत्वीय लहरींचा हम अर्थात स्पंदन कंपनांचे अस्तित्व शोधण्यात अखेर जगभरातील खगोल शास्त्रज्ञांना यश आलं आहे.
या महत्वपूर्ण संशोधनात पुणे जिल्ह्यातील खोडदच्या आंतरराष्ट्रीय दुर्बिन सेंटर्सचा खूप मोलाचा सहभाग राहिला. विशेष म्हणजे या संधोशनात ब्रम्हांडाचं कोडं उलगडण्यात मोलाचा फायदा होणार आहे.
जागतिक शास्त्रज्ञ अलबर्ट आईनस्टाईनने गुरूत्वीय सिद्धांत मांडताना शंभरेक वर्षांपूर्वी एक भाकित केलं होतं. या खगोलीय ब्रम्हांडात शकडो पल्सार टायमिंग अर्थात स्पंदनीय घड्याळं अस्तित्वात असून त्यांच्यातून अतिशय कमी वारंवारितेच्या गुरूत्वीय लहरींचा कंप अर्थात सुक्ष्म आवाज ऐकू येत असावा.
शास्रीय भाषेत त्यालाच हम असं म्हटलं जातं. तोच कंप ऐकण्यासाठी जगभरातले खगोल शास्त्रज्ञ झपाटलेले होते.
2002 सालापून त्यावर संशोधन सुरू होतं. त्याच टिममध्ये भारतीय खगोल संशोधक मोलाचं योगदान देत होते. सर्वात महत्वाचं म्हणजे यासंबंधीच्या सर्व सुक्ष्म नोंदी या खोडदच्या आंतरराष्ट्रीय रेडिओ दुर्बिन सेंटर अर्थात जीएमआरटीत घेतल्या जात होत्या.
या हमचे अस्तित्व सिद्ध झाल्याने आपल्या ब्रम्हाडाची निर्मिती नेमकी कशी झाली याचं कोडं उलगडण्यात मोलाची साथ लाभणार आहे, अशी माहिती डॉ जे. के. सोळंकी (वरिष्ठ अधिकारी एनसीआरए व सभासद विज्ञान प्रसार समिती एनसीआरए जीएमआरटी) यांनी दिली.
खरंतर या ब्रम्हांडाची निर्मिती नेमकी कशी झाली? याबाबत आजही संशोधन सुरुच आहे.
याच संशोधनात आता हमचं अस्तित्व मान्य झाल्याने गुरूत्वीय लहरींच्या संशोधनातील एक महत्वाचा टप्पा पूर्णत्वास गेला आहे.
तसंच आईन्सस्टाईनने 1916 साली गुरूत्वीय लहरींबाबत केलेलं भाकित आज अखेर खरं ठरलं आहे.
या संशोधीय योगदानात फक्त आपले भारतीय खगोल शास्त्रज्ञच आघाडीवर नाही तर आपल्याच पुणे जिल्ह्यातील खोडदच्या रेडिओ दुर्बिनीतून ही सर्व सुक्ष्म निरिक्षण नोंदवली गेलीत याचा आम्हा भारतीयांना खचितच गर्व आहे.