मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज भीषण असं अग्नितांडव घडलं. भरधाव वेगाने जाणारा ऑईल टँकर उलटला. त्यानंतर अवघ्या काही क्षणात भीषण आग लागली. या आगीत 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज दुपारी ही घटना घडली. पुण्याहून मुंबईच्या दिशेनं येणारा एक ऑईलने भरलेला टँकर भरधाव वेगाने येत होता. खंडाळ्याजवळ पोहोचला असता अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं.
त्यानंतर एक्स्प्रेस वेवर टँकरमध्ये उलटला. टँकर जसा उलटला तसा त्याने पेट घेतला. टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आगीचा भडका उडाला. टँकरमध्ये असलेल्या चालकाने आणि इतर सहकाऱ्यांनी बाहेर उड्या मारल्या पण तोपर्यंत उशीर झाला होता.
आगीचा भडका उडाल्यामुळे तीन जण होरपळून जागेवरच ठार झाले. ऑईल टँकरला लागलेल्या या आगीनं रौद्ररूप धारण केलं. त्यानंतर आगीचे लोळ हे पुलाखाली देखील पसरले होते. त्यामुळे पुलाखालची वाहतूकही थांबवण्यात आली होती.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एका क्रेनच्या मदतीने टँकरला बाजूला करण्यात आले होते. पण आगीमध्ये क्रेन सुद्धा भक्षस्थानी सापडली. खबरदारीचा उपाय म्हणून एक्स्प्रेस वेवरील दोन्ही बाजुची वाहतूक थांबवण्यात आली होती.
ऑईल टँकरला लागलेली ही आग पुलाखाली देखील पसरली होती.
अखेर 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. चार ते पाच तास एक्स्प्रेसवरील वाहतूक ठप्प होती. अखेरीस धीम्या गतीने वाहतूक सुरू झाली आहे.