रोपं असलेल्या कुंड्यांचा हा फोटो पाहिल्यानंतर सर्वात आधी आपल्यासमोर एखादी रोपवाटिका येईल किंवा एखाद्या बागेतील ही झाडं असावीत असंच वाटेल.
मात्र हा एका रेल्वे स्टेशनचा फोटो आहे, असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल आणि हे रेल्वे स्टेशन दुसरं तिसरं कुठलं नाही तर भारतातीलच आहे.
भारतातील रेल्वे स्टेशन कसे आहेत याची कल्पना आपणा सर्वांना आहेच. त्यामुळे असं रेल्वे स्टेशन भारतात नेमकं आहे कुठे असा प्रश्न तुम्हाला पडला आहे.
रोपं लावून हिरवंगार नटलेलं हे रेल्वे स्टेशन केरळमधील आहे. केरळचं हे थिरूर रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे मंत्रालयानेच या रेल्वे स्टेशनचे फोटो ट्वीट करण्यात आले आहेत.
हे फोटो पाहिल्यानंतर नेटिझन्स या रेल्वे स्टेशनच्या प्रेमातच पडले आहेत. कधी एकदा लॉकडाऊन संपतो आणि या रेल्वे स्टेशनवर जातो असं सर्वांना झालं आहे. लॉकडाऊनप्रमाणेच लॉकडाऊननंतरही हे रेल्वे स्टेशन असंच हिरवंगार दिसावं, या झाडांची नीट काळजी घेतली जावी, अशी प्रतिक्रिया सर्वांनी दिली आहे.
थिरूर रेल्वे स्टेशनवर तर कुंड्यांमध्ये लावलेल्या रोपट्यांनी स्थानकाची शोभा वाढवली मात्र भारतातील आणखी एक असं रेल्वे स्टेशन जे नैसर्गिकरित्या इतकं सुंदर आहे.
रेल्वे प्लॅटफॉर्म लाल, रेल्वे ट्रॅक लाल आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवरील सीटवर सर्वकाही लाल. या रेल्वे स्टेशनवर लाल फुलांचा सडाच पसरला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर एखाद्या फिल्ममधील किंवा परदेशातील रेल्वे स्टेशन असावं असंच प्रत्येकाला वाटेल.
मात्र हे कोणत्या फिल्ममधील किंवा परदेशातील नव्हे तर भारतातील रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशनदेखील केरळमधीलच आहे. मलप्पुरम जिल्ह्यातील मेलाट्टूर रेल्वे स्टेशन. वेल्लियार नदीच्या जवळच हे रेल्वे स्टेशन आहे. मान्सूनमध्ये या रेल्वे स्टेशनचं सौंदर्य अधिकच वाढतं आणि ते डोळ्यात साठवून ठेवण्यासारखंच असतं.
फक्त रेल्वे स्टेशनच नाही तर लॉकडाऊनमध्ये अशा सुंदर हायवेचीदेखील फोटो सोशल मीडियावर शेअर होऊ लागले आहेत.
एरवी ट्रॅफिक पाहायला मिळणाऱ्या या हायवेच्या डिव्हायडरवर फुललेल्या पांढऱ्या, गुलाबी, पिवळ्या फुलांनी सर्वांंच लक्ष वेधून घेतलं.
नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वीच हे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते.
हा राष्ट्रीय महामार्ग-52 आहे. हरयाणातील कैथाल-हिसार मार्गावर असं वृक्षारोपण करण्यात आलं आहे.