कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आज जनतेनं कर्फ्यू पाळण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यानुसार आज देशभरात कर्फ्यू पाळला जात आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी सकाळी 7 ते रात्री 9 या कालावधीमध्ये बंद राहणार आहेत. त्यामुळे नेहमीची गजबजलेली ठिकाणं, रस्तेही आज ओस पडले आहेत.
नागरिकांना दिवसाच्या सुरुवातीलाच कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असल्यानं लोकांनीही कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे.
मुंबई-पुण्यासह अनेक मोठ्या शहरांमध्ये मेट्रो-लोकल-बस सेवाही आज 7 ते रात्री 9 पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय कुणीही बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये आज पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबईतील मंदिरं, पर्यटनस्थळ, रेल्वे स्थानकांवरही नागरिकांना जाण्यासाठी परवानगी नाही. कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात.
कर्फ्यूदरम्यान अनेक शहरांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार आहे. प्रशासनाचा आदेश डावलून रस्त्यावर येणाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.