या आठवड्याची टीआरपीही वेगळाच आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत नेहमी पहिल्या पाचात असलेली तुला पाहते रे मालिका बाहेर गेलीय. यावेळी पहिल्या पाचातही तिला स्थान मिळालेलं नाही. आणि बाजी मारलीय ती आदेश बांदेकर यांच्या झिंग झिंग झिंगाट शोनं. या शोनं पाचवं स्थान पटकावलंय. सर्वसामान्यांना अंताक्षरीत भाग घेता येतो. पुन्हा आदेश बांदेकरांची अशी वेगळी जादू आहे. ते प्रत्येक व्यक्तीच्या काळजालाच हात घालतात. होम मिनिस्टरमुळे आधीच बांदेकर घराघरात पोचलेत. झिंग झिंग झिंगाटमध्येही ते प्रत्येकालाच आपलंसं करतात.
चौथा नंबर पटकवलाय चला हवा येऊ द्या या शोनं. म्हणजे पाच आणि चारवर मालिका नसलेल्यांनीच स्थान पटकावलंय. या शोमध्ये येणारे गेस्टही शोची टीआरपी वाढवतात. बाकी कलाकारांचा कल्ला लोकप्रिय आहेच.
टीआरपी रेटिंगमध्ये बदल तर झालेत. पण झी मराठीनंच स्थान कायम ठेवलंय.
स्वराज्यरक्षक संभाजी तिसऱ्या स्थानावर आहे. पुतळा मातोश्रींचं देहावसान प्रेक्षकांनाही रडवून गेलं. कलाकारांनी प्रत्येक एपिसोडमध्ये राखलेला ऐतिहासिक आब कायम आहे. डाॅ. अमोल कोल्हेनंही संभाजी महाराजांचे वेगवेगळे पैलू प्रभावी मांडलेत.
पाठकबाईंची निवडणूक राॅकिंग ठरतेय. प्रेक्षक गावातल्या राजकारणात रमतोय. त्यामुळे 'तुझ्यात जीव रंगला'नं दुसरा नंबर पटकावलाय.
पुन्हा एकदा माझ्या नवऱ्याची बायको नंबर वनवरच आहे. शनाया, राधिका आणि गुरू यांची केमिस्ट्री दर एपिसोडला खुलत चाललीय. राधिका शनायाच्या नाकीनऊ आणतेय. प्रेक्षक एंजाॅय करतायत.