यावेळच्या टीआरपी रेटिंगच्या चार्टनं बरेच धक्के दिलेत. नेहमी दोनवर असलेली मालिका तुला पाहते रे चक्क पाचव्या स्थानावर गेलीय. सुबोध भावेचा विक्रांत आणि गायत्रीची ईशा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात फिके पडलेत, असं दिसतंय. विक्रांत-ईशाचा प्रेमाचा खेळ थोडा फिल्मीच झालाय. त्याचा हा परिणाम असावा.
'तुझ्यात जीव रंगला' मालिका तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आलीय. मालिकेत आता निवडणुका, राजकारण, कारस्थानं अशा बऱ्याच गोष्टी सुरू झाल्यात. पाठकबाई आणि राणादा यांच्यात थोडा दुरावाही आलाय. त्याला खतपाणी घालतेय वहिनी. अनेक आठवडे ही मालिका तिसऱ्या स्थानावरच होती. डिसेंबरच्या सुट्टीचे परिणामही टीआरपीवर होतात. अनेक जण बाहेरगावी जातात. त्यामुळे प्रेक्षकवर्ग कमी होतो.
टीआरपी रेटिंगचा चार्ट पाहिला तर जाणवतं एकाच छत्राखाली असणाऱ्या मालिकांची एकमेकांत स्पर्धा आहे.
चला हवा येऊ द्या शो यावेळी तिसऱ्या स्थानावर आलाय. बरेच आठवडे चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर हा शो होता. पण यावेळी त्यानं प्रगती केलीय. झिंग झिंग झिंगाट आणि कानाला खडा या शोपैकी एकदाच झिंगाट पाचव्या नंबरवर आला होता.
हल्ली प्रेक्षक अवास्तव, अतिरंजक मालिकांऐवजी ऐतिहासिक मालिकेत रमतात, असं दिसतंय. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेनं दुसरा नंबर पटकावलाय. आतापर्यंत ही मालिका चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर असायची. पण शंभूराजेंविरुद्धचं कटकारस्थान, संभाजी महाराजांचं रायगडावर प्रस्थान, सोयराबाईंची मानसिक उलाघाल हे सगळं मालिकेतल्या कलाकारांनी उत्तमरित्या उभं केलंय. इतिहासाचं हे दर्शन प्रेक्षकांना आवडायला लागलंय. बऱ्याच जणांना शंभूराजेंचा इतिहास माहीत नव्हता. मालिकेमुळे तो समोर आलाय.
बाकी काहीही असो, राधिका, शनाया आणि गुरुनाथ काही नंबर वन सोडत नाहीत. याही वेळी माझ्या नवऱ्याची बायको पहिल्या स्थानावर आहे. गुरूनं राधिकेचं घर सोडून जाणं, शनायासोबत लग्नाचे प्लॅन्स करणं हे सगळं प्रेक्षक पसंत करतायत. पुन्हा एकदा शनाया राॅक्स!