टीआरपी रेटिंगची गणितं दर आठवड्याला बदलत राहतात. गेल्या आठवड्याप्रमाणेच यावेळी ही पाचव्या स्थानावर आहे चला हवा येऊ द्या. जानेवारीमध्ये अनेकदा सिनेमांच्या प्रमोशनमुळे अनेकांना विनोदात साचलेपणा जाणवला. त्यामुळे हा शो पाचव्या स्थानावरच कायम राहिला. दोन आठवड्यापूर्वी हा शो तिसऱ्या स्थानावर होता.
चला हवा येऊ द्या प्रमाणे यावेळीही 'स्वराज्यरक्षक संभाजी चौथ्या स्थानावर आहे. यावेळी ही मालिका चौथ्या नंबरवर आलीय. खरं तर या मालिकेत इतिहासाचं एकेक पान उलगडत जातं. ही मालिका पाहताना प्रेक्षक इतिहासात जातात. अर्थात, इतर मालिकांची घोडदौडही जोरदार आहे. झी मराठीच्या मालिकांना एकमेकांतच स्पर्धा करावी लागते. दोन आठवड्यांपूर्वी ही मालिका दुसऱ्या स्थानावर होती.
टीआरपी रेटिंगचा चार्ट पाहिला की पुन्हा एकदा हेच लक्षात येतं की इतर वाहिन्यांवरच्या मालिकांना पहिल्या पाचमध्ये स्थानच नाही. झी मराठीच्या मालिकांच्या एकमेकांत स्पर्धा आहेत.
या आठवड्यात तुला पाहते रे मालिकेच्या टीआरपीमध्ये कमालिची घसरण झाली आहे. गेले अनेक आठवडे ईशा आणि विक्रांतच्या लग्नाची धामधूम प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळली. पण आता त्यांच्या संसाराला सुरुवात झाल्यामुळे प्रेक्षकांना त्यात फारसं स्वारस्य राहिलं नाही असंच दिसतंय. ही मालिका तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे.
'तुझ्यात जीव रंगला' मालिका या आठवड्यात दुसऱ्या नंबरवर आली. या मालिकेत सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. महत्त्वाचं म्हणजे पाठकबाई निवडणुकीला उभ्या राहतात, त्याभोवतीच सर्व गोष्टी सुरू आहेत. त्याचा फायदा मालिकेला झाला.
कुठल्या मालिकेचं काहीही होवो, माझ्या नवऱ्याची बायको पहिलं स्थान सोडायला तयार नाही. आता तर मालिकेत गुरू शनायाशी लग्न करायला निघालाय. त्यात अजून एक प्रेमाचा ट्रॅक सुरू आहे. तो म्हणजे जेनीचा. ख्रिश्चन आणि गुजराती लग्नाचा बारही लवकर उडणार. राधिका, शनाया, शनायाची आई यांच्यातल्या चढाओढी प्रेक्षकांना पाहायला आवडतायत.