लॉकडाऊनच्या काळात सगळे घरात अडकल्यानं कंटाळले आहेत. मात्र या लॉकडाऊनचा एक फायदा असाही झाला आहे की निसर्गानं त्याचं रुप पालटलं आहे.
गाड्यांची वर्दळ पूर्ण थांबल्यानं आणि इतर गोष्टींमुळं होणारं प्रदुषण कमी झाल्यानं हवेची गुणवत्ता सुधारली आहे. यामुळे हवेत असणारे प्रदुषणाचे धुलीकण आणि ढग नाहीसे झाले आहेत.
प्रदुषणाचे ढग दूर झाल्यानं दूरवरचं दृश्यही स्पष्ट असं दिसत आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपुर इथंही वायुप्रदुषण कमी झाल्यानं आता बर्फाळ पर्वतही दिसू लागले आहेत.
सहारनपूरच्या आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी उत्तराखंडमधील गंगोत्री पर्वत रांगेचे फोटो टिपले आहेत. हवाई अंतरानुसार जवळपास 200 किमी दूर अंतरावर असलेली ही पर्वत रांग सहारनपूर स्पष्ट दिसते.
सध्या सहारनपूरचा एअर इंडेक्स चाळीसच्या आसपास आहे. त्यामुळे हे विलोभनीय दृश्य दिसत असल्याचं प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.