कोरोना, भारत-चीन सीमेवरील तणाव आणि काश्मीरमधील दहशतवादासोबतच आता आणखी एक संकट भारतावर येणार आहे. संयुक्त राष्ट्रातील एका मोठ्या एजन्सीनं या संदर्भात भारताला सावधानतेचा इशारा दिला आहे.
पुढच्या दोन आठवड्यांमध्ये पुन्हा एकदा भारतावर टोळधाडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण होऊ शकतं. टोळधाड ही समस्या अद्याप पूर्णपणे गेली नसून आता पुन्हा एकदा भारतावर हे संकट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिमेकडून हजार किलोमीटर दूरवरून हा टोळधाडीचा हल्ला सुरू झाला आहे. याआधीही राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यात टोळधाडीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.
संयुक्त राष्ट्राच्या एका एजन्सीनं फूड अॅण्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशननं या संदर्भात सावधानतेचा इशारा दिला आहे. ही टोळधाड या आठवड्यात पाकिस्तानच्या सीमेवर तर पुढच्या दोन आठवड्यात भारतावर हल्लाच्या तयारीत आहे.
FAO ने दिलेल्या माहितीनुसार टोळधाड राजस्थानकडून येण्याची शक्यता आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी केली तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.
मान्सूनचा काळ हा टोळांच्या प्रजननासाठी सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळे या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात टोळांचं प्रजनन झालं तर धोका अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या वर्षी पहिल्यांदाच भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात टोळधाड झाली. राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे.
आता पुन्हा एकदा टोळधाड येण्याबाबत इशारा दिल्यानं शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.