सकाळी सव्वा नऊच्या सुमारास हेलिकॉप्टरने अरुणाचल प्रदेशातील बोमडिला इथून उड्डाण केले होते. यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टरचा एटीसीशी असलेला संपर्क तुटला होता.
यानंतर बोमडिलाच्या पश्चिमेला असलेल्या मंडलाजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली. हेलिकॉप्टरमधील दोन पायलट बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. यासाठी शोधपथके रवाना झाली आहेत.
संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी जवळपास सव्वा नऊच्या सुमारास अरुणाचल प्रदेशातील बोमडिला इथं एका ऑपरेशनल सॉर्टीवेळी लष्कराचं चीता हेलिकॉप्टर कोसळलं.
त्याचा एटीसीसोबतचा संपर्क तुटल्याची माहिती मिळाली होती. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर लष्कराने पायलटच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
यामध्ये अद्याप तरी जिवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
चीता हेलिकॉप्टर 60 वर्षे जुने असून सातत्याने याचे अपघात होत असल्याने याबाबत प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.
2007 मद्ये युपीए सरकारच्या काळात तत्कालीन संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांनी चीता हेलिकॉप्टरसारखी जुनी मशिन्स आता लष्कराच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम नसल्याचं सांगत ते बदलण्याची गरज व्यक्त केली होती.
चीता हेलिकॉप्टर एका वेळी पाच लोकांना घेऊन उड्डाण करू शकते. हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरचं वैशिष्ट्य म्हणजे हे सियाचीनसारख्या दुर्गम भागात सहजपणे उड्डाण करू शकते.
कारगिल युद्धात या हेलिकॉप्टर्सनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.