उत्तर भारतात दसरा शुक्रवारी साजरा झाला. जल्लोषात रावण दहन सुरू असताना अमृतसरवासियांसाठी शुक्रवारची रात्र काळरात्र ठरली. ज्या मैदानावर जल्लोष होता, फटाक्यांची आतषबाजी होती त्या मैदानाचं रूपांतर स्मशानात झालं. सर्वत्र आक्रोश पसरला, लोकांच्या किंकाळ्या, जीवाच्या आकांताने पळणारे लोक असं ह्रदय पिळवटून टाकणारं ते दृष्य होतं. अपघातातल्या मृतांचा आकडा 60 वर गेला आहे.
अमृतसरजवळच्या चौरा बाजार इथं दरवर्षी रावण दहनाचा कार्यक्रम होतो आणि हजारो लोक तो कार्यक्रम पाहण्यासाठी येत असतात. तिथलं खास आकर्षण असतं ते फटाक्यांची आतषबाजी. यावहीवर्षी हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होती. हा कार्यक्रम ज्या मैदानावर होतो त्याच मैदानाजवळ रेल्वे ट्रॅक आहे.
मैदान गर्दीनं खच्चून भरलेलं होतं. पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्यामुळं लोक रेल्वे ट्रॅकवर उभे राहून कार्यक्रम पाहू लागले. रावण दहन सुरू झालं. फटाक्यांची आतषबाजीही सुरू झाली. जळत्या रावण्याच्या पुतळ्याचा काही भाग खाली कोसळला. लोकांची धावपळ सुरू झाली. त्यात फटाक्यांच्या आवाजामुळं काय होतंय हे कुणालाच कळलं नाही.
त्याच दरम्यान पठाणकोटहून अमृतसरला येणारी ट्रेन (ट्रेन नं.74943 ) भरधाव वेगानं आली. ट्रेनचा वेग प्रचंड असल्यानं लोकांना बाहेर पडण्यासाठी वेळच मिळाली नाही. भरधाव ट्रेन लोकांना चिरडत पुढं गेली आणि मैदानाचं रूपांतर स्मशानात झालं.
सगळीकडे लोकांच्या किंकाळ्या ऐकू जात होत्या. लोक सैरावैरा पळत होते. जखमींचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता. काही वेळात पोलीस आणि अधिकाऱ्यांनी बचाव कार्य सुरू केलं. पण तेव्हा वाचवायला काहीच शिल्लक नव्हतं.
या कार्यक्रमाला एक व्यक्ती आपल्या कुटुंबियांना घेऊन जाणार होता. मात्र काही कारणांमुळे त्यांच्या घरची मंडळी येवू शकली नाही. त्यामुळं रावण दहन तुम्हाला व्हिडीओ कॉलवरून दाखवतो असं त्यांनी आपल्या घरच्या मंडळींना सांगितलं. जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा त्यांनी व्हिडीओ कॉल करून दहन आणि आतषबाजी घरच्या मंडळींना दखवली. तेही आनंदानं ती दृष्य बघत होती. मात्र पुढच्या काही सेंकदात काय बघायला मिळणार याची त्यांना कल्पानाही केली नसेल.
काह मिनिटं होत नाही तोच आतषबाजीच्या दृश्यांची जागा किंकाळ्यांनी घेतली. एक भरधाव ट्रेन लोकांना चिरडत जातेय असं दृश्य त्यांनी पाहिलं आणि व्हिडीयो कॉल बंद पडला. कारण घटनास्थी प्रचंड गोंधळ उडाला होता. काहीतरी अपघात घडला याची त्यांना कल्पना आली मात्र नेमकं काय झालं हे त्यांना कळत नव्हतं.
काँग्रेसच्या स्थानिक नेत्या असल्यानं नवज्योत कौर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्या कार्यक्रमाला खूप उशीरा आल्याचा आरोप लोकांनी केलाय. त्यांनी मदत कार्यात जी मदत करायला पाहिजे ती त्यांनी केली नाही असाही आरोप होतोय. मात्र नवज्योत कौर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
रावणाचा पुतळा जळू लागला आणि त्याच वेळी ट्रॅकवर एक ट्रेन धडधडत आली. ट्रॅकवर उभे राहून लोक रावणदहन बघण्यात इतके मग्न झाले होते, की त्यांना ट्रेन आल्याची जाणीव व्हायला बराच उशीर झाला. ट्रेननं वाजवलेला भोंगाही फटाक्यांच्या आवाजात ऐकू आला नाही आणि बघता बघता रेल्वेखाली अनेक लोक चिरडले गेले.