उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिं कोश्यारी यांचं गाव बागेश्वर जिल्ह्याच्या दुर्गम भागात आहे. कोश्यारी यांच्या गावाचं नाव आहे नामती चेटाबगड, सध्या या गावाचा जगाशी संपर्क तुटला आहे. गावामध्ये पोहोचण्यासाठी रस्ताही नाहीये, मुसळधार पावसामुळे रस्त्याचा भाग नदीमध्ये वाहून गेला आहे.
कोश्यारींच्या गावामध्ये बरेच दिवसांपासून वीजही नाही, तंच मोबाईल नेटवर्कही नाहीये. गावातल्या नागरिकांना जिल्हा मुख्यालयात 30 किमी दूर जावं लागतंय. तेव्हाच गावात पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा मुख्यालयाला मिळत आहे.
जर शासन आणि प्रशासन माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या गावातल्या व्यवस्था सुधरवू शकत नसेल, तर इतर गावांची काय अवस्था असेल? असा प्रश्न नामती चेटाबगडचे सरपंच नारायण कौश्यारी यांनी विचारला आहे. गावातल्या बऱ्याच घरांना पावसामुळे भेगा पडल्या आहेत, तर शेतकऱ्यांची पीकं राम गंगा नदीमध्ये वाहून गेली आहेत.
अनेक ठिकाणी तर रस्तेही नदीत वाहून गेले आहेत. अनेकठिकाणी भूस्खलन होत आहे. पावसाच्या हाहाकाराला एवढे तास होऊन गेले तरी प्रशासनाने अजून रस्ते उघडलेले नाहीत, तसंच वीज पुरवठाही पुन्हा सुरू केलेला नाही. गावकऱ्यांना फक्त मदतीचं आश्वासन दिलं जात आहे.
मागच्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरूच असल्याचं सरपंच कोश्यारी सांगतात. गावांमध्ये घरांमधलं अंतर जास्त असल्यामुळे नुकसान किती झालं याचा अंदाज अजूनही आलेला नाही.
नामती चेटाबगडमधल्या नुकसानीची माहिती मिळाली आहे. रस्ते उघडण्यासाठी जेसीबी पाठवण्यात येत आहे. गावात वीजपुरवठा पुन्हा सुरू व्हावा, यासाठी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे, असं जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी शिखा सुयाल यांनी सांगितलं.