बहुतेक सेलिब्रिटी विशेषतः सुपरस्टार्सच्याभोवती आपल्याला नेहमी मजबूत, कणखर आणि काळ्या पोशाखातील बाउन्सर्सचा घेराव दिसतो. हे बॉडीगार्ड्स नेहमी अतिउत्साही जमावापासून आपल्या बॉसचं रक्षण करतात. मात्र, त्यांच्यामुळे आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सहज जवळ जाता येत नाही, म्हणून आपण त्यांचा तिरस्कार करतो. त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल आपण कधीही विचार करत नाहीत.
बॉडीगार्ड्सना देखील त्यांचं स्वतःचं खासगी आयुष्य, कुटुंब, जबाबदाऱ्या असतात. तरी देखील आपला जीव धोक्यात घालून ते काम करतात. आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील ओंगोल शहरातील बाऊन्सर्सची आयुष्यं एखाद्या कथेप्रमाणे आहेत.
ओंगोले शहरात सुमारे 30 सुशिक्षित बाउन्सर काम करत आहेत. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोठ्या लग्न समारंभांपासून ते राजकीय कार्यक्रमांसारख्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये ते काम करतात. प्रत्येक कार्यक्रमासाठी ते दोन हजार रुपये आकारतात.
कार्यक्रमांमध्ये सुरक्षेची जबाबदारी पार पाडणं हे त्यांचं कर्तव्य तर आहेच शिवाय एक आरामदायक कौटुंबिक जीवन जगण्यासाठी ते याकडे करिअर म्हणूनही बघतात. ते प्रत्येक कार्यक्रमाची सुपारी घेत नाहीत. कार्यक्रमाच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ते कार्यक्रमाच्या आयोजकांशी सविस्तर चर्चा करतात.
परिपूर्ण शरीरसौष्ठव राखण्यासाठी ते काटेकोरपणे आहार घेतात. त्यांच्या आहारामध्ये फळे, सुका मेवा, अंडी, फायबर आणि प्रथिनं यांसारख्या पदार्थांचा समावेश असतो. वर्कआउटनुसार आणि त्यांना आवश्यक असलेल्या कॅलरींनुसार ते हा केमिकलविरहित आहार घेतात. जेव्हा हे बाउन्सर आपलं कर्तव्य बजावण्यासाठी जात असतात तेव्हा त्यांचे कुटुंबीय त्यांना प्रोत्साहन देतात आणि सोबतच काळजी घेण्याचाही सल्ला देतात.
गर्दीवर नियंत्रण ठेवताना त्यांना दुखापत आणि इतर धोक्यांचा सामना करावा लागल्याचंही या बाउन्सर्सनी सांगितलं. ओंगोलमधील सतत गर्दी असलेल्या एका मोठ्या मॉलमध्ये बाउन्सर म्हणून काम करणारा पृथ्वी म्हणाला, "मी गेल्या सहा वर्षांपासून बाउन्सरचं काम करत आहे. मी ग्रॅज्युएट आहे. मी एक छोटी जिम देखील चालवत आहे. खूप आधी मला कोणीतरी या नोकरीची ऑफर दिली आणि आता मी करिअर म्हणून या कामाकडे बघतो." पृथ्वीच्या चेहऱ्यावर बाउन्सर ट्रेडमार्क असलेला धीरगंभीरपणा दिसून आला.
मोठ-मोठ्या सेलिब्रिटींसाठी काम करणाऱ्या बाउन्सर्सला मोठ्या प्रमाणात मानधन मिळतं. मात्र, लहान शहरांमध्ये स्थानिक पातळीवर कार्यक्रमांमध्ये सुरक्षेचं काम करणाऱ्यांना अजूनही म्हणावा तसा आदर आणि कमाई मिळत नाही अशी खंतही काही बाउन्सर्सनी व्यक्त केली.