लता मंगेशकर - लता मंगेशकर या एक महान भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना गणले जाते. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतरत्न, भारतीय गानकोकिळा (Nightingale of India) आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.
आशा भोसले - आपल्या सुरांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज म्हणजे आशा भोसले. आशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. संगीतातील विविध पुरस्कारांसह त्यांना महाराष्ट्र सरकारचे जवळपास 15 पुरस्कार शिवाय पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.
भीमसेन जोशी - कला क्षेत्राक पंडित भीमसेन जोशी यांनाही देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्राराने देशाला दिलेले हे रत्न लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते. त्यांना कलाविश्वातील विविध पुरस्कार मिळाले होते. पद्मभूषण, पद्मविभूषण हे पुरस्कारही त्यांना मिळाले होते.
सचिन तेंडुलकर - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची क्रिकेट खेळातील कामगिरी अविस्मरणीय, अद्वितीय आहे. त्याचे क्रिकेट खेळातील विक्रम मोडणे कोणत्याही खेळाडूसाठी मोठे आव्हान आहे. महाराष्ट्राच्या या खेळाडूने देश-विदेशात नाव कमावलं. सचिनला भारतरत्न, पद्मविभूषण, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेत. तो राज्यसभेचा खासदारही होता.
दादासाहेब फाळके - भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील नाशिकमध्ये झाला होता. त्यांचे पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके. मात्र, दादासाहेब या नावानेच ते प्रसिद्ध होते. दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून (19970) चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत-तंत्रज्ञाला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्यात येतो.
आर.के. लक्ष्मण - रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण हे एक भारतीय व्यंगचित्रकार, चित्रकार आणि विनोदी लेखक होते. आर. के. लक्ष्मण या नावाने ते ओळखले जातात. आर.के. लक्ष्मण "द कॉमन मॅन"च्या निर्मितीसाठी आणि 1951 मध्ये सुरू झालेल्या टाइम्स ऑफ इंडियातील "यू सेड इट" या त्यांच्या दैनिक व्यंगचित्रांसाठी अत्यंत प्रसिद्ध होते.
एम. एफ. हुसेन - हुसेन हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय चित्रकार होते. त्यांचा उल्लेख भारताचा‘पिकासो’ म्हणून केला जातो. चित्रकला, छायाचित्रण, चित्रपटनिर्मिती, काव्य अशा अनेक क्षेत्रांत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांचे पूर्ण नाव मकबूल फिदा हुसेन. मात्र, एम. एफ. हुसेन या नावानेच ते सर्वपरिचित आहेत. त्यांचा जन्म पंढरपूर (महाराष्ट्र) येथे सुलेमानी बोहरा जमातीत फिदा हुसेन आणि झूनाइब या दाम्पत्यापोटी झाला होता.
किशोरी आमोणकर - किशोरी आमोणकर या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. त्या एक श्रेष्ठ गायिका होत्या व आदराने त्यांना 'गानसरस्वती' असे संबोधले जात होते. किशोरीताईंचा जन्म मुंबई येथे इ.स. 1931 मध्ये झाला. पद्मभूषण, पद्मविभूषणसह त्यांना संगीत क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले.