बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन नेहमीच सेशल मीडियावर सक्रिय असतात. ते नेहमीच ट्विटरच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मांडताना दिसतात.
सध्या मुंबईमध्ये सुरू असलेल्या आरे बचाव आंदोलनाबाबत अमिताभ यांनी एक ट्विट केलं होतं. मात्र यामुळे ते आता अडचणीत आले आहेत.
अमिताभ यांनी काल 17 सप्टेंबरला आरे मेट्रो प्रकल्पाला समर्थन देणारं ट्विट केलं होतं. प्रदुषण रोखण्यासाठी आपण आणखी झाडं लावायला हवी. मी माझ्या गार्डनपासून सुरुवात केली आहे. अशा आशयाचं ते ट्वीट होतं.
मात्र अशाप्रकारे ट्वीट करणं अमिताभ यांना चांगलंच महागात पडलं. अमिताभ यांच्या ट्वीटनंतर आरे बचावासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी अमिताभ यांच्या घरासमोर निदर्शन केली.
'बच्चन सर गार्डन मधून कधीच जंगल तयार होऊ शकत नाही', 'आरे वाचवा' असे फलक घेऊन अमिताभ यांच्या घरासमोर हे आंदोलक उभे राहिले.
कुलाबा वांद्रे सिप्झ या मेट्रोच्या कारडेपोसाठी आरे कॉलनीत वृक्षतोड सुरू आहे. ती थांबावी यासाठी तिथले नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करतायेत. याला अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी सुद्धा पाठिंबा दिला आहे.
मेट्रेच्या या कारशेडसाठी आरेतली जवळपास 30 हेक्टर जमीन वापरण्यात येणार आहे, ज्यात 3184 झाडांची कत्तल केली जाणार आहे.
आरे संवर्धन गटानं याआधी हरित लवादाकडे याचिकाही दाखल केलीये. याच गटाकडून दोन आठवड्यांपासून मिस्ड कॉल आणि एसएमएस मोहिम राबवण्यात येतेय. याशिवाय आरे वाचवण्यासाठी माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश सरसावलेत. कारशेडसाठी पर्यायी जागा असतानाही सरकारनं प्रतिष्ठेचा मुद्दा केल्याची टीका रमेश यांनी केलीय.