मुंबई, 24 जुलै: तुम्ही बँकेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवले असतील किंवा गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. Fixed Deposit मॅच्युअर झाल्यानंतर पैसे काढून घ्या कारण आता ते बँकेत ठेवून काही फायदा मिळणार नाही
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India RBI) एफडीशी संबंधित महत्त्वाचा नियम बदलला आहे. आरबीआयने बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटची मुदत संपुष्टात आल्यानंतर क्लेम न करण्यात आलेल्या रकमेवरील व्याजाचे नियम बदलले आहेत.
नव्या नियमानुसार, जर मॅच्युरिटीची तारीख पूर्ण झाली असेल आणि तरी देखील रकमेचा दावा केला गेला नाही, तर त्यावर मिळणारे व्याज कमी असेल.
RBI ने जारी केलेल्या सर्क्यूलरमध्ये असं म्हटलं आहे की, असा निर्णय घेण्यात आला आहे की फिक्स्ड डिपॉझिट मॅच्युअर झाल्यास आणि तरी देखील ती रक्कम बँकेतच कोणत्याही क्लेमशिवाय पडून राहिली असेल तर त्यावर बँकेच्या बचत खात्याच्या व्याजदराच्या हिशोबाने व्याज दिले जाईल. जर एफडीवर मिळणारे व्याज बचत खात्यावरील व्याजापेक्षा कमी असेल तर एफडीच्या हिशोबाने व्याज दिले जाईल.
हा नवा नियम सर्व बँकांना लागू होईल. नवीन नियम सर्व व्यापारी बँका, लघु वित्त बँक, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांमधील ठेवींना लागू असेल. निश्चित ठेव म्हणजे बँकेत एका ठराविक कालावधीसाठी निश्चित व्याजदारासाठी काही ठराविक ठेव ठेवली जाते. यामध्ये आवर्ती, संचयी, पुनर्गुंतवणूक ठेवी आणि रोख प्रमाणपत्रे यासारख्या ठेवींचा समाविष्ट आहेत.
पैशांची सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी अनेकजणांची आजही पसंत फिक्स्ड डिपॉझिट आहे. हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय मानण्यात येतो. ज्या गुंतवणुकदारांना जोखीम नको असते ते खासकरून एफडीमध्ये गुंतवणूक करतात. एफडीवर मिळणारे व्याजदर गुंतवणूकदारांना विशेष आकर्षित करतात.
एफडीमध्ये तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक, सुनिश्चित लाभ, गुंतवणूक करण्यास सहजता आणि पेमेंट करणं सुलभ इ. अनेक फायदे मिळतात. बाजारातील चढउताराचा देखील एफडीवर कोणताही परिणाम होत नाही.