सणासुदीला किंवा शुभ मुहूर्तांवर सोनं खरेदीची आपल्याकडे परंपरा आहे. भारतात सर्वात जास्त सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. असं असलं तरी तुम्हाला माहिती आहे का भारतापेक्षाही जास्त सोनं असणारा देश आहे. भारताचा नंबर तर पहिल्या पाच देशांमध्ये सुद्धा येत नाही.
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. मंदीच्या भीतीने सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याला संकटाचा साथीदार म्हणतात. त्यामुळे जगातील जवळपास सर्वच देश सोन्याचा साठा करतात.
प्रत्येक देशाची सेंट्रल बँक सोन्याची साठवणूक करते. सोन्याचा उपयोग हेज फंड म्हणून केला जातो. वर्ल्ड अँड स्टॅटिस्टिक्सने ट्विटरवर जगभरातील देशांच्या सोन्याच्या साठ्याची यादी जाहीर केली आहे.
या आकडेवारीनुसार, अमेरिकेकडे जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा आहे. त्यात 8,133 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे. अमेरिकेनंतर जर्मनीकडे सोन्याचा दुसरा मोठा साठा आहे. त्यात 3,355 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे.
इटली 2,452 मेट्रिक टन सोन्याच्या साठ्यासह तिसऱ्या तर फ्रान्स 2,299 मेट्रिक टन सोन्याच्या साठ्यासह चौथ्या क्रमांकावर आहे. चीनकडे 2,011 टन सोन्याचा साठा आहे. स्वित्झर्लंडकडे 1,040 टन आणि जपानकडे 846 टन सोन्याचा साठा आहे.
या यादीत भारत नवव्या क्रमांकावर आहे. भारताकडे 787 टन सोन्याचा साठा आहे. सोन्याचा साठा कमी अधिक प्रमाणात वाढत असतो किंवा कमी देखील होत असतो.
या यादीत भारतानंतर नेदरलँड, तुर्की, सौदी अरेबिया, यूके, स्पेन, पोलंड, सिंगापूर, ब्राझील आणि स्वीडन यांचा समावेश आहे.