भारतीय रिजर्व्ह बँकेने सर्व कर्जदाता संस्थानांना, दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी नुकतंच घोषित करण्यात आलेलं, व्याजावरील व्याज माफ करण्याची योजना लागू करण्याचं सांगितलं आहे. या योजनेंतर्गत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या व्याजावर, लावलं जाणारं व्याज 1 मार्च 2020 ते पुढील सहा महिन्यांसाठी माफ केलं जाईल.
चक्रवाढ व्याज आणि साधं व्याज यांच्यातील फरकाइतकी रक्कम सरकार देणार आहे. ही रक्कम 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 या लोन मोरेटोरियम कालावधीसाठी असेल.
आरबीआयने सर्व बँकांना 5 नोव्हेंबरपर्यंत ही रक्कम क्रेडिट करण्यास सांगितलं आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर 6500 कोटी अतिरिक्त रुपयांचा भार पडणार आहे.
दोन कोटीहून अधिक कर्ज नसणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेंतर्गत एमएसएमई (MSME) लोन, एज्युकेशन, हाउसिंग, कंज्युमर, ऑटो, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्डवरील लोनचा समावेश आहे.
योजनेचा फायदा घेण्यासाठी 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत लोन अकाऊंट स्टँडर्ड असलं पाहिजे. म्हणजेच कर्जाचा हप्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत भरला गेला पाहिजे, हे नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स (NPA) श्रेणीमध्ये नसले पाहिजे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणताही अर्ज करण्याची गरज भासणार नाही.