दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढतच आहेत. सोन्याचे दर कमी होतच नाहीत. त्यामुळे सोनं खरेदी करणं आवाक्याबाहेर जात आहे. आशातच आता एक दिलासा देणारी बातमी सूत्रांकडून मिळाली आहे. सोन्याचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार मास्टरप्लॅन तयार करत आहे.
केंद्र सरकार आता सोन्यावरील इंपोर्ट ड्युटी कमी करण्याचा विचार करत आहे. न्यूज एजन्सी ब्लूमबर्गने सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार सोन्याची अवैध शिपिंग रोखण्यासाठी सरकार आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे.
सोन्याची सर्वात जास्त आयात भारतात केली जाते, यामध्ये भारताचा दुसरा क्रमांक येतो. मात्र सोन्यावरील आयात शुल्क वाढल्याने भारतात सोन्याच्या तस्करीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार सोन्यावरील आयात शुल्क 12.5% वरून 10% करण्याचा विचार करत आहे.
सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याच्या शिफारशी स्वीकारल्या जातील की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही असंही या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं नाही. सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय झाला, तर सरकार अर्थसंकल्पात त्याची घोषणा करेल, अशी शक्यता आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर करतील. आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय हा कठीण असणार आहे. सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णयही महत्त्वाचा ठरणार आहे, कारण व्यापार तूट कमी करण्यासाठी सरकारला आयात कमी करायची आहे.
सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने त्याचा परिणाम सरकारच्या उत्पन्नावर होतो. जुलै 2022 मध्ये सरकारने दरवाढ केल्यापासून सोन्याची आयात काही प्रमाणात कमी झाली आहे. अर्थ मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
जुलै-सप्टेंबर तिमाहीमध्ये सोन्याच्या आयातीमध्ये साधारण 23 टक्क्यांनी घट झाली आहे. World Gold Council ने दिलेल्या आकडेवारीनुसार आयात शुल्क वाढवल्याने सोन्याची आयात कमी झाली आहे. तर बुलियन इंडस्ट्रीने आयात कर कमी करण्याची मागणी केली असल्याचं समोर आलं आहे.
सोन्याच्या आयात शुल्कात वाढ झाल्याने त्याचा फटका देशांतर्गत उद्योगाला बसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सोन्याची अवैध आयात वाढली आहे. सोन्यावरील आयात शुल्क 4-6% दरम्यान असावे, असे त्यांचे मत आहे.