सोन्याचे दागिने खरेदी करताना खुप बारकाईने लक्ष द्यावे लागते. कारण फसवणूक होण्याची शक्यता तेथे असते. सोन्याच्या शुद्धतेबद्दल देखील खात्री करुन घ्यावी लागते. हॉलमार्किंगच्या सुविधेमुळे लोकांची फसवणूक कमी झाली आहे. प्रत्येक ज्वेलर्सला हॉलमार्क असलेले दागिने विकणे बंधनकारक आहे. मात्र तरीही कुणाला दागिन्यांची शुद्धता तपासायची असेल तर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने (BIS) लोकांसाठी मोबाइल अॅप तयार केले आहे.
या अॅपच्या मदतीने तुम्ही दागिन्यांची शुद्धता त्वरित तपासू शकता. 'BIS CARE APP' असे या अॅप्लिकेशनचे नाव आहे. गेल्या वर्षी 1 जुलैपासून सरकारने सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग चिन्ह बदलले. पूर्वी दागिन्यांवर 4 ते 5 हॉलमार्क चिन्हे होती. आता फक्त तीन चिन्हे आहेत. BIS हॉलमार्क हे पहिले चिन्ह आहे. दुसरे चिन्ह शुद्धतेची माहिती देते. तर सहा अंकी अल्फान्यूमेरिक कोड हे तिसरे चिन्ह आहे. ज्याला HUID क्रमांक म्हणतात.
हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) या सहा अंकी कोडमध्ये अक्षरे आणि अंक दोन्ही असतात. प्रत्येक दागिन्यांच्या हॉलमार्किंगच्या वेळी एक HUID क्रमांक दिला जातो. ही संख्या नेहमीच वेगळी असते. एकाच HUID क्रमांकामध्ये दोन दागिने असू शकत नाहीत.
अॅप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून अॅप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागेल. अॅप इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्हाला अॅप उघडावे लागेल आणि त्यात तुमचे नाव, फोन नंबर आणि ईमेल आयडी टाकावा लागेल आणि मोबाईल नंबर आणि ईमेल अॅड्रेस द्वारे स्वतःची पडताळणी करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही अॅप्लिकेशन वापरू शकता.
या BIS केअर अॅपमध्ये व्हेरिफाय HUID फीचर देण्यात आले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या दागिन्यांची शुद्धता तपासू शकता. या अॅप्लिकेशनमध्ये एक उत्तम फीचर आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तक्रारही नोंदवू शकता.