छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा आज साजरा होत आहे. शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग मराठी माणसाला आजही प्रेरणादायी वाटतात.
शिवरायांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी येथे फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला.
शहाजीराजेंनी जिजाऊ आणि शिवबा यांना बंगरुळला बोलावून घेतले. शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजेही तिथेच होते.
आदिलशाही सरदार मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवून गाव उजाड केले. शहाजीराजांनी आपल्या जहागिरीची जबाबदारी शिवरायांवर सोपवली होती. त्यामुळे इथे शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला. गुंड-पुंडांचा बंदोबस्त केला.
शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी सवंगड्यांसोबत भोर तालुक्यातील रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली.
पुण्याजवळील रांझेच्या पाटलांनी परस्त्रीवर अत्याचार केल्याचं समजताच शिवरायांना राग अनावर झाला. चौकशी करून पाटलाचे हात-पाय तोडण्याची शिक्षा दिली.
जावळीच्या चंद्रराव मोरे याने शिवरायांशी शत्रूत्व घेतले. तेव्हा शिवरायांनी मोरेंचा बंदोबस्त करून जावळी परिसराची व्यवस्था लावली.
जावळीच्या मोरेंचा पराभव झाल्यावर विजापूरचा मातब्बर सरदार अफझल खान स्वराज्यावर चाल करून आला. शिवरायांनी प्रतापगडावर त्याचा बंदोबस्त केला.
अफझल खानाच्या वधानंतर शिवरायांनी पन्हाळा जिंकला. तेव्हा खवळलेल्या आदिलशहाने सिद्दी जोहरला स्वराज्यावर चाल करून पाठवले. बाजीप्रभू देशपांडे यांनी लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणत घोडखिंड लढवली.
शिवराय विशाळगडावर सुखरूप पोहोचावेत म्हणून बाजीप्रभूंनी घोडखिंड लढवली. सिद्धीच्या फौजांशी लढतानाच बाजीप्रभू धारातीर्थी पडले. घोडखिंड पावन झाली.
इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, सिद्दी सारख्या परकीय सत्तांना शह देण्यासाठी शिवरायांनी मराठा आरमार उभारले. दुर्गाडी किल्ल्याजवळ खाडीच्या किनाऱ्यावर आरमारी गोदी उभारली.