वारी संप्रदायात संत तुकारामांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असं म्हणत निसर्गाचं रक्षण करा, वृक्ष लावा, प्राण्यांचे रक्षण करा असा संदेश दिला आहे.
तोच संदेश देण्याकरता सातारा आणि कराड वनविभागाचे अधिकारी वृक्षदिंडी घेऊन पंढरपूरपर्यंत जाणार आहेत.
या वृक्षदिंडीच्या माध्यमातून निसर्ग जोपासा, वाघाची शिकार करू नका. वनपरिक्षेत्राचे नियम आणि कायदे समजून घ्या, असा संदेश देत ही दिंडी वाटचाल करत आहे.
या दिंडीच्या निमित्ताने वनपरिक्षेत्रात कायम तैनात असणारा खाकी वर्दीतला वन अधिकारी टाळ मृदुंगाच्या तालावर फुगड्या खेळताना दिसला.
हरिनामाचा गजर करत जनसामान्यांमध्ये मिसळण्याचा त्यांचा हा उपक्रम आहे. वन विभागाच्या अनोख्या कार्याची चर्चा होत आहे.
वारीत वनाधिकाऱ्यांनी हरिनामाचा गजर करत टाळ-मृदुंगाच्या तालावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले.
या वारीत महिला वन रक्षकांचाही समावेश होता. त्या डोक्यावर तुळशी घेऊन वारीत दाखल झाल्या होत्या.
सातारा आणि कराड वनविभागातर्फे वारीच्या माध्यमातून लोकांना वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्याचा संदेश देण्यात आला.