सध्या सरकारी शाळांतील शिक्षकही विद्यार्थीकेंद्री शिक्षणास प्राधान्य देत आहेत. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना सहज शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जातात.
सांगली महापालिकेच्या मिरज शाळेतील शिक्षक संतोष यादव हे उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी शाळेत विविध उपक्रम सुरू केले आहेत.
यादव यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करीत क्यूआर कोड शिक्षण प्रणालीची निर्मिती केली. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रक्रिया सोपी आणि सुलभ झाली आहे.
मिरजेतील मनपा शाळा क्र. 1 ही क्यूआर कोडचा वापर करून अध्यापन करणारी महापालिकेची राज्यातील ही पहिली शाळा ठरली आहे.
डिजीटल शिक्षण प्रणालीत क्यूआर कोडचा वापर ही भविष्यातील सुलभ शिक्षणाची पहिली पायरी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हवे ते ज्ञान चटकन मिळणार आहे.
यादव यांनी सन 2021 पासून शाळेत विविध उपक्रम राबवले. त्यात आठवडी बाजार, परसबाग, पुस्तकांची गुढी, कोरोनाची होळी, माझी राखी माझ्या सैनिकासाठी अशा उपक्रमांचा समावेश आहे.
तसेच MY NAME ON MY HAND, माझे शरीर - माझा योग, माझी शाळा माझा विठ्ठल, माझी शाळा-माझा बाप्पा, माझे शिक्षक माझे गुरू असे विद्यार्थी केंद्री उपक्रमही त्यांनी राबविले.
ज्ञानाचा दीपोत्सव, शब्दांचा खजिना, ज्ञानाची हंडी, रक्षाबंधन-वृक्षाबंधन, सर्पमित्र, नागपंचमी असे सण-उत्सवासोबत शिक्षणाचे महत्त्व सांगणारे उपक्रम राबविले.
महिला सक्षमीकरण- माझा एक दिवस सुट्टीचा, माझा हादगा, जागर स्त्रीशक्तीचा, माझा दांडिया, आम्ही सावित्रीच्या लेकी असे महिला सबलिकरणासाठीचे उपक्रम राबविले.
महाराष्ट्रातील पहिली QR code शाळा म्हणून ही शाळा नावारूपास आली आहे. क्यूआर मुळे मराठी, गणित, इंग्रजी, इतिहास, भूगोल, हिंदी विषयाशी संबंधित शिक्षण सोपे झाले आहे.
जगातील खंड, देश, महासागर, पर्यटन स्थळे, खेळ, कविता, कोडी, शब्द, इंग्रजी उच्चार, शिष्यवृत्ती, जनरल नॉलेज आदी माहिती विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होते.
कविता, गोष्टी, गाणी, प्रार्थना, प्रतिज्ञा, जोडशब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दकोडी असे भाषा विषयक ज्ञान समृद्ध करण्यास मदत होते.
विविध स्वरुपाची माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये संकलित केली आहे. त्याचा क्यू आर कोड मुख्याध्यापिका सविता पवार, सुलभा ढमाले, संतोष यादव यांनी तयार केला आहे.
नवोपक्रमशील शिक्षक संतोष नानासाहेब यादव यांना सर फांऊडेशनचा नॅशनल टीचर इनोव्हेशन अवॉर्ड मिळाला आहे.
विद्यार्थी शाळेतील मोबाईलचा वापर करून QR कोड द्वारे स्वतःच्या आवडीने अभ्यास करतात. या नवोपक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सविता पवार, सुलभा ढमाले, अश्विनी विटेकर, महानंदा राजमाने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.