नुकताच MPSC राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सांगलीच्या प्रमोद चौगुले या तरुणाने सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक पटकावला आहे.
प्रमोद यांचं मुळ गाव मिरज तालुक्यातील सोनी हे आहे. वडील बाळासाहेब चौगुले हे टेम्पो चालक आहेत. तर आई शिवणकाम करून संसाराचा गाढा चालवत होत्या.
घरची परिस्थिती बेताची असताना आई-वडिलांनी दोन्ही मुलांना शिक्षण दिलं. प्रमोदचं प्राथमिक शिक्षण सोनी गावातच झालं. तर पुढील शिक्षण नवोदय विद्यालयात झालं. त्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.
इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर प्रमोद यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. भारत कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी पत्करली.
नोकरी करत असतानाच UPSC आणि MPSC परीक्षा देण्याची त्यांची इच्छा झाली. त्यासाठी त्यांनी रिस्क घेत 2015 मध्ये भारत कॉर्पोरेशनमधील नोकरी सोडली.
UPSC परीक्षेचा अभ्यास सुरू केला. मात्र, लवकर यश मिळालं नाही. तरीही अपयशाने खचून न जाता त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले.
राज्यसेवा परीक्षा 2020 चा गेल्यावर्षी निकाल लागला. त्यामध्ये प्रमोद यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला. यामध्ये उद्योग उपसंचालक म्हणून त्यांची निवड झाली.
मात्र, प्रमोद यांच्या आवडीची पोलीस अधीक्षक ही पोस्ट तेव्हा नव्हती. त्यामुळे त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांनी लक्षणीय मिळवत सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला येण्याचा पराक्रम केला.
स्पर्धा परीक्षा करत असतानाही प्रमोद यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. नोकरी सोडून अभ्यास करूनही यश मिळत नव्हतं. सांगलीमध्ये आलेल्या पुरात प्रमोद यांचं संपूर्ण घर वाहून गेलं होतं. तसंच कोरोनाकाळात त्यांच्या कुटुंबाला कोरोनानं गाठलं होतं.
प्रमोद यांचा विवाह झाला असून त्यांना एक मुलगी आहे. ते आपल्या पत्नीला आणि मुलीला सोडून पुण्यात MPSC च्या तयारीसाठी राहत होते.
संकटातही प्रमोद यांनी ध्येयाचा पाठलाग सोडला नाही. त्यामुळे कठीण परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी MPSC परीक्षेत बाजी मारली.
प्रमोद यांचं हे यश राज्यातील आणि देशातील अनेक तरुण तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणारं आहे.