पुणेकरांची कोंडी करणारा चांदणी चौकातला पूल अखेर जमीनदोस्त झाला आहे. पहाटेच्या सुमारास स्फोटकांच्या साह्याने अवघ्या 5 सेकंदामध्ये पूल पाडण्यात आला आहे.
चांदणी चौकातील पूल पाडण्याची मोहिम अखेर फत्ते झाली. रात्रीपासून वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. रात्री 11 वाजण्याच्या आधी सर्व परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता.
पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण 35 मिमी व्यासाचे 1 हजार 300 छिद्र पाडण्यात आले होते.
600 किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात आला होता. 1 हजार 350 डिटोनेटरचा उपयोग नियंत्रीत पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी करण्यात आली होती. ब्लास्ट एक्स्पर्ट आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम फत्ते करण्यात आली.
पूल पाडतांना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये यासाठी 6 हजार 500 मीटर चॅनल लिंक्स, 7 हजार 500 वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, 500 वाळूच्या पिशव्या आणि 800 वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आले होते.
पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपयोगात आणली जाते. 16 एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, 30 टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, 2 अग्निशमन वाहन, 3 रुग्णवाहिका, 2 पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण 210 कर्मचारी संबंधित यंत्रणतर्फे नियुक्त करण्यात आले.
पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व प्रक्रिया पार पडली. ते स्वत: नियंत्रण कक्षात बसून होते.