नाशिकचा मानाचा राजा महागणपतीचा आगमन सोहळा सोमवारी रात्री उशिरा मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात पार पडला. यावेळी सारडा सर्कल ते गाडगे महाराज पुतळा मेन रोडपर्यंत ढोल - ताशांच्या गजरात आणि आतिशबाजीत मिरवणूक काढण्यात आली होती.
या वर्षी काेराेनाचे निर्बंध हटल्याने यंदा गणेशाेत्सव जल्लाेषात साजरा करण्याचा निर्धार शहरातील गणेश मंंडळांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. याच पार्श्वभुमीवर शहरातील शिवसेवा युवक मित्र मंडळांच्या वतीने नाशिकच्या मानाचा राजा महागणपतीचा आगमन साेहळा पार पडला.
या मिरवणुकीत अनेक ढोल पथक,लेझिम पथक,पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झाले होते. या साेहळ्यात सहभागी झालेल्या वादकांचे हाेणारे लयबध्द वादनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले हाेते.
गणरायाच्या भव्य मूर्ती व आगमण साेहळ्याचे क्षणाचे छायाचित्र माेबाईलमध्ये टिपण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली हाेती. यावेळी शेकडो भाविकांनी मिरवणुकीत सहभागी होत दर्शनाचा लाभ घेतला.
शिवसेवा युवक मंडळाचे संस्थापक विनायक पांडे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेवा मित्र मंडळ जवळपास 50 वर्षांपासून शालिमार मेनरोड चौकात या मानाचा राजा महागणपतीची स्थापना करते. यावेळी भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.