नागपूर शहरातील विज्ञानप्रेमी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी कायमच जिज्ञासा असलेल्या रामण विज्ञान केंद्र हे नागपुरातीलच नव्हे तर विदर्भातील एक महत्त्वाचे विज्ञान माहिती केंद्र आहे. विज्ञानावर आधारित खेळण्यांसह येथे विज्ञानाच्या सिद्धांतापासून ते आकाशगंगा पर्यटकांना एकच छताखाली अनुभवता येते.
आता याच केंद्रात 'हॉल ऑफ ऑगमेंटेड रियालिटी' हे नवीन दालन लोकांसाठी खुले करण्यात आले आहे. नवीन तंत्रज्ञानाची परस्परसंवादी पद्धतीने ओळख करून देत येथे वास्तविक जग आणि संगणक निर्मित जगाचे मिश्रण करून एक वेगळेच मनोरंजन विश्व येथे अनुभवता येणार आहे.
रामन विज्ञान केंद्र आणि तारांगणच्या वतीने नव्याने सुरू केलेले हे दालन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून हे बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
रामण विज्ञान केंद्राद्वारे नव्याने सुरू करण्यात आलेले 'हॉल ऑफ ऑगमेंटेड रिआलिटी' हे दालन नवीन तंत्रज्ञानाची परस्परसंवादी पद्धतीने ओळख करून देणारे आहे. येथे वास्तविक जग आणि संगणक निर्मित जगाचे मिश्रण अबालवृद्धांना भुरळ घालते आहे.
सप्लिमेंटेड रिआलिटी, निसर्गातील 10 मौल्यवान मूलद्रव्ये, मूलद्रव्यांचा शोध, रेषांतून सजीव निर्मिती, जेश्चर अॅनालिसिस, जीवन प्रणाली, जिओग्राफिकल मॅपिंग, आभासी तळे, हृदयाचे ठोके आदी येथे प्रेक्षकांसाठी प्रदर्शित केले आहेत.
मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MECL), नागपूर द्वारे विशेष सहकार्याने हे प्रायोजित करण्यात आले आहे. नव्याने खुल्या करण्यात आलेल्या या अनोख्या सुविधेला भेट देण्याचे आवाहन रामन विज्ञान केंद्र आणि तारांगण, नागपूरचे प्रकल्प समन्वयक अर्णव चॅटर्जी यांनी केले आहे.
विज्ञान दालनात काही विशेष शो चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात डिजिटल व हायब्रिड तारांगण, प्री-हिस्टॉरिक ॲनिमल पार्क, विविध प्रकारच्या गॅलरी, स्काय ऑब्जर्वेशन प्रोग्राम, सायन्स ऑन अ स्फिअर तारांगण शोचा समावेश आहे.
तसेच 3D शो मध्ये डोळ्यावर चश्मे लावून चित्र प्रत्यक्ष धावून येत असल्याचा भास होतो. यामध्ये सजीव जीवाश्माचा समावेश करण्यात आला आहे. यासह आकाशगंगेमध्ये असलेल्या ग्रहांबद्दल परिपूर्ण माहिती, त्यांची चित्रं थ्रीडी स्वरूपात जवळून अनुभवण्याच्या विशेष शोचा यात समावेश करण्यात आला आहे.
वर्षभर पर्यटकांसह, विद्यार्थ्यांचा मोठा राबता या केंद्रावर असतो. रमण विज्ञान केंद्रामध्ये मनोरंजन विज्ञान कक्ष, विज्ञान शोध प्रदर्शन कक्ष, 'पाणी -जीवनाचे अमृत' अशा विषयांवर आधारित कक्ष आहेत. याचसोबत 16 एकर परिसरात मोठी अशी विज्ञान बाग फुलवली आहे.