सेंगोल अर्थात राजदंड... नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळेस नंदी अंकित असलेला राजदंड नव्या भवनात स्थापित करण्यात येणार आहे. याचं कोल्हापूर कनेक्शन समोर आलं आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेला सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून राजदंड पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हातामध्ये सुपूर्त करण्यात आला होता. तो राजदंड कित्येक वर्ष प्रयागराज येथील वस्तू संग्रहालयामध्ये होता. आता नव्या भवनांच्या उद्घाटनाच्या वेळेला हा राजदंड सभापतींच्या जवळ कायमस्वरूपी स्थापित करण्यात येणार आहे.
असाच एक राजदंड कोल्हापुरातील एका लहानशा गावात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापुरात बाराव्या शतकातील इतिहासाचे दडलेल पान नव्याने सर्वांसमोर आले आहे.
राजदंड धारण करण्याची पद्धत भारतात प्राचीन काळापासून आहे. सेंगोल चोल वंशाचे राजे वापरत होते. त्या काळात एक राजा दुसऱ्या राजाला सत्ता हस्तांतरीत करताना राजदंड सोपवत असत.
कोल्हापूरच्या दक्षिणेला राधानगरी तालुक्यात असलेल्या चक्रेश्वरवाडी या गावात श्री चक्रेश्वर मंदिर आहे. याच मंदिरात सूरसुंदरीच्या भग्न मूर्तीने हातात हा छातीजवळ धरलेला राजदंड आपल्याला पाहायला मिळतो. या राजदंडाचे छायाचित्र कोल्हापुरातील मूर्ती अभ्यासक उमाकांत रांनिंगा यांच्याकडे संग्रहित आहे.
कोल्हापुरात असणारा राजदंड बाराव्या शतकातील असल्याचे पुरावे प्राचीन शिलालेखांमधून आढळून येतात. त्यामुळे कोल्हापूरातील हा अनमोल असा इतिहास कालीन खजिना पुन्हा एकदा नव्याने अभ्यासकांसाठी संशोधनाचा विषय बनला आहे.
वास्तू, शिलालेख, मूर्ती अशा गोष्टीतून बाराव्या शतकातील इतिहासाचे पुरावे अनेकदा कोल्हापुरात आढळून आले आहेत. नव्या संसद भवनातील राजदंड आणि कोल्हापुरातील हा राजदंड यातील साधर्म्य पाहता एक नवी ओळख करवीर नगरीला यानिमित्ताने मिळाली.