आंब्यांचा ताजा गर वापरून बनवलेल्या आम्रखंडाची मेजवानी बऱ्याच जणांना आवडत असते. कोल्हापूरच्या केतकी पाटील यांनी अक्षय्य तृतीयेनिमित्त आम्रखंडाची रेसिपी सांगितली आहे.
घरी बनवलेला किंवा विकत आणलेला चक्का, पिठी साखर, आंब्याचा गर इलायची इतकेच साहित्य लागते. तयार आम्रखंडावर सजावटीसाठी काजू आणि बदाम आपल्याला हवे तसे वापरू शकतो.
चक्का घरी बनवताना घट्ट दही एका सुती कापडात बांधून त्यावर एखादी जड वस्तू काही तास ठेवावी. नंतर 4-5 तास ते दही कापडासहीत फ्रिज मध्ये ठेवावे. दुसऱ्या दिवशी तयार चक्का एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यावा.
जितका चक्का तितकीच पिठीसाखर घ्यावी. साखर थोडीफार बारीक करून वापरली तरी चालते. फक्त साखर चक्क्यामध्ये मिक्स करताना थोडी थोडी टाकावी. अन्यथा चक्का पातळ होऊ शकतो.
चक्क्यामध्ये साखर/पिठीसाखर टाकून एकजीव होईपर्यंत चांगले फेटून घ्यावे. हे साधे श्रीखंड तयार होते. याचा गोडसरपणा थोडा कमीच ठेवावा त्यानंतर मिक्सर मधून फिरवून घेतलेला आंब्यांचा गर तयार मिश्रणात टाकावा. आणि सर्व एकजीव करून घ्यावे.
थोडे केशराचे दूध, इलायचीची बारीक केलेली पावडर, जायफळ पावडर आदी घटक आपापल्या आवड आणि उपलब्धते प्रमाणे घालून एकत्र करून घ्यावे.
तयार झालेल्या आम्रखंडावर सजावटीसाठी बारीक तुकडे करून काजू-बदाम, चेरी, टुटी फ्रुटी आदी आपण वापरु शकतो. खाण्याआधी हे तयार आम्रखंड साधारण 2 तास तरी फ्रिजमध्ये थंड होऊ द्यावे. त्यामुळे याला थोडा घट्टपणा येतो.