महाराष्ट्रातील कोकणात उष्णतेची लाट आहे. तर विदर्भातही उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. दरम्यान, आज विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. मुंबईतील सांताक्रूझ आणि डहाणू येथे उष्णतेची लाट आली आहे. तर गुरूवारी दुपारनंतर पुणे, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि हलकी गारपीट झाली.
गुरूवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये ब्रह्मपूरी येथे राज्यातील उच्चांकी 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर यासोबतच गोंदिया येथे तापमान 43 अंशाच्या पार आहे. तसेच चंद्रपूर, वर्धा, अकोला, सोलापूर, अमरावती, नागपूर, यवतमाळ येथे तापमानाचा पारा 42 अंशांच्या वर गेला आहे. तर उर्वरीत राज्यात कमाल तापमान 35 ते 42 अंशांच्या दरम्यान आहे.
राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गुरूवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ४०.० (२१.१), जळगाव ४१.९ (२३.८), धुळे ४०.६ (२२.०), कोल्हापूर ३९.५ (२३.७), महाबळेश्वर ३३.२ (१४.८), नाशिक ३८.८(२१.५), निफाड ३९.८(१८.०), सांगली ३९.९ (२१.६), सातारा ३९.९ (२१.६), सोलापूर ४२.२ (२५.४), सांताक्रूझ ३८.८ (२६.६), डहाणू ३७.६ (२५.०), रत्नागिरी ३३.७ (२५.७),
राज्यातील वाढत्या तापमानाने नागरिक त्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्याला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.