बीड जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत घाणीच्या साम्राज्य असणाऱ्या ठिकाणी फुलबाग आणि भाजीपाला बहरला आहे. जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायतीच्या वतीने ही बाग फुलवण्यात यश आले आहे.
परळी तालुक्यातील मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मोहा येथे हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमातून शाळेने आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.
मोहा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पूर्वी घाणीचे साम्राज्य होते. येथील दुर्गंधीचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. विद्यार्थ्यांना होणार त्रास कमी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापकांनी प्रयत्न केले.
घाणीच्या ठिकाणी फळ, फूल आणि पालेभाज्या लावण्याची नामी शक्कल मुख्याध्यापकांना सुचली. त्यांनी ग्रामपंचायतीला ही बाब कळवली. आणि शाळा परिसरात बाग फुलवण्याचा निर्णय झाला.
शाळा परिसरात जांभूळ 3, आंबा 2, चिकू 3, आवळा 3, मोसंबी 4, पेरू 2, लिंबू 2, नंदीवाण 1, वड 4, करंजी 1, नारळ 6, गुलाब 4, कढीपत्ता 3 झाडे लावली आहेत.
फळांच्या झाडासह येथे वांगे, टोमॅटो, मिरची, काकडी, दोडका, भेंडी, कोथिंबीर, भोपळा, वालाच्या शेंगा लिंबू, अशा पालेभाज्या देखील लावण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतच्या बोरचे पाईपलाईनद्वारे बागेला पाणीपुरवठा केला जातो.
बागेतील भाजीपाल्याचा शालेय पोषण आहारात उपयोज केला जातो. मागील दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या या बागेसाठी 35 हजारांचा खर्च आला आहे. हा खर्च शाळा आणि ग्रामपंचायतीने मिळून केला असल्याचे मुख्याध्यापक सांगतात.