होळी आणि धूलिवंदनचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी हा सण साजरा करण्याची वेगवेगळी परंपरा असते.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असणाऱ्या विडा गावची प्रथा सध्या चर्चेत आहे. या गावात धूलिवंदनच्या दिवशी जावयाची चक्क गाढवावरून मिरवणूक काढली जाते.
होळी आणि धूलिवंदन सण जवळ आला की विडा गावचे सर्व जावई भूमिगत होतात. त्यांना शोधून गावात आणले जाते.
यंदा देखील गावकऱ्यांनी जावयांचा शोध घेतला. जावयांना शोधण्यासाठी गावातील तरुणांची पथके फिरत होती.
गावचे जावई अविनाश करपे रात्री झोपेत असताना सापडले. त्यांना दीड वाजता विडा गावात आणण्यात आले.
यंदाचे मानकरी अविनाश करपे ठरले. युवराज पटाईत यांचे ते जावई आहेत.
जावई अविनाश करपे यांची गावात गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली. तेव्हा सर्व गावकरी यामध्ये सहभागी झाले होते.
मिरवणूक झाल्यानंतर सर्वजण गावातील हनुमान मंदिराच्या पारावर जमले. गावकऱ्यांकडून जावयाला संपूर्ण पोषाखाचा आहेर करण्यात आला.
विडा गावातील ही परंपरा निजामकालीन आहे. गेल्या 90 वर्षांहून अधिक काळ ही परंपरा कायम असल्याचे गावकरी सांगतात.
विडा गावाप्रमाणेच महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये धूलिवंदनाला वेगवेगळ्या परंपरा आहेत. त्याची उत्सुकता सर्वांनाच असते.