यंदा जून संपत आला तरी पावसानं हजेरी लावलेली नाही. मान्सूनने दगा दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
पेरणीसह शेतीची सर्व कामे खोळंबली असून महागाईनेही कंबरडे मोडण्याची स्थिती आहे. भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत.
पावसाने ओढ दिल्याने मार्केटमधील भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली असून सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
बीड जिल्ह्यात काही शेतकरी उपलब्ध पाण्यावर भाजी पिकवत असून काही टँकरने पाणी देत आहेत. खर्च वाढल्याने आणि मार्केटमधील मागणीमुळे भाजीच्या दरात वाढ झाली आहे.
सध्या मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे डब्यासाठी महागड्या भाज्या खरेदी करणे अनेकांना शक्य नाही त्यामुळे गृहिणींसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
भाजी बाजारात टोमॅटोचा दर 80 रुपये प्रति किलो झाला आहेत. तर कांदा हा 20 रुपये, बटाटा 30 रुपये, भेंडी तब्बल 70 रुपये किलोवर पोहोचली आहे.
हिरव्या मिरचीने उच्चांकी 100 रुपयांचा दर गाठला असून वांगे 80, फुल कोबी 80, गवार 60, कारले 70 ,चवळी 40, सिमला मिरची 90, काकडी 60 तर लिंबू 40, रुपयांवर पोहोचले आहे.
शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही जेवणांमध्ये सर्वाधिक वापर होणारा लसूण आणि आलेही महाग झाले आहे. लसणाचा दर 90 रुपयांवर तर आले 220 रुपये प्रति किलोवर गेला आहे.
मान्सून आणखी लांबल्यास आणखी भाजीपाला महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक गणिते विस्कटणार आहेत. त्यामुळे रोजच्या जेवणातून भाजीपाला गायब होण्याची शक्यता आहे.