केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज नागरी सेवा 2022 चा निकाल जाहीर केला आहे. विशेष म्हणजे UPSC मुलाखत संपल्यानंतर अवघ्या 5 दिवसांनी निकाल जाहीर झाला.
यंदाचा निकाल महाराष्ट्राची मान उंचावणारा ठरला आहे. कारण यंदा 1-2 नव्हे तब्बल 15 मराठी उमेदवार हे परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
यात अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मंगेश खिलारी या तरूणाने यूपीएससी परीक्षेत 396 वा नंबर मिळवत आपल्या आई वडीलांचे स्वप्न पूर्ण केलं आहे. (हरीष दिमोटे, प्रतिनिधी)
वडील चहाचं छोटं दुकान चालवतात तर आई विडी कामगार असूनही त्यांनी आपल्या मुलाच्या स्वप्नांना बळ दिल्याने त्याने यशाचा हा टप्पा गाठला आहे.
संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी पाराजी खिलारी छोटसं चहा नाष्ट्याचं दुकान चालवतात. तर मंगेशची आई विड्या बनवून कुटूंबाला हातभार लावते.
घरची परिस्थिती बेताची असतानाही मंगेशने यूपीएससी परीक्षेचा खडतर अभ्यास पूर्ण केला आणि आज तो देशात 396 वा नंबर मिळवत पास झाला आहे.
मंगेशचे कुटुंबीय आणि मित्रांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा केला.
घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलानेही शिक्षण घेताना आई वडिलांना जास्त पैसे द्यावे लागणार याची काळजी घेतल्याचं वडील सांगतात.
मंगेशने सुरुवातीपासून यूपीएससी करण्याचा ध्यास घेतला होता. त्यामुळे त्याने जे ठरवलं ते करून दाखवल्याने मंगेशचे मित्र आणि भाऊ आनंदात आहेत.
परिस्थिती कशीही असली तरी मुलांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम आई वडील करत असतात. आज मंगेशने यशाचा मोठा टप्पा गाठल्याने आई वडिलांच्या कष्टाला फळ मिळाले आहे.