15 ऑगस्टला भारत आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. मात्र भारतासह जगातील आणखी पाच देशही याच दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करतात.
भारताप्रमाणे दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, कांगो, बहरीन आणि लिक्टेस्टाइन हे देशही 15 ऑगस्टला स्वतंत्र झाले होते.
यूएस आणि सोव्हिएत फोर्सेजने 15 ऑगस्ट 1945 ला दक्षिण कोरियाची जपानपासून मुक्तता केली होती. त्यामुळे यादिवशी दक्षिण कोरिया आपला राष्ट्रीय दिन साजरा करतो.
दक्षिण कोरियाप्रमाणेच उत्तर कोरियाही 15 ऑगस्ट 1945 जपानच्या तावडीतून मुक्त झालं होतं.
15 ऑगस्ट 1971 ला बहरीन ब्रिटनपासून स्वतंत्र झालं होतं. 1960 च्या दशकापासून ब्रिटिश सैन्य बहरीन सोडून जात होतं. 15 ऑगस्टला बहरीन आणि ब्रिटनमध्ये करार झाला होता, त्यानंतर बहरीने स्वतंत्र देश म्हणून ब्रिटनसह आपले संबंध कायम ठेवले. बहरीन आपला नॅशनल हॉलीडे 16 डिसेंबर मानतं कारण यादिवशी बहरीनचे शासक इसा बिन सलमान अल खलीफा यांनी गादी मिळवली होती.
आफ्रिकेतील कांगो देश 15 ऑगस्ट 1960 ला फ्रान्सच्या राजवटीतून मुक्त झालं होतं. त्यानंतर रिपब्लिक ऑफ कांगो तयार झाला. 1880 पासून कांगोवर फ्रान्सची राजवट होती, त्यावेळी फ्रेंच कांगो म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर 1903 मध्ये मिडिल कांगो झाला.
जगातील सर्वात लहान देशांपैकी एक लिक्टेस्टाइन देश. 15 ऑगस्ट 1866 ला हा देश जर्मनीपासून मुक्त झाला आणि 1940 सालापासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो.