पेट्रोलियम जेली : त्वचेवर लागलेला डाय किंवा हेअर कलर काढून टाकण्यासाठी पेट्रोलियम जेली हा एक चांगला उपाय आहे. हेअर डाय किंवा कलर करताना आपल्याला साधारण माहिती असतंच की त्वचेवर कुठेकुठे रंग लागतो. यात बराचसा भाग तर कपाळावरील हेअर लाईनचाच असतो. त्यामुळे हेअर कलर करण्याआधी हेअर लाईनवर आधी पेट्रोलियम जेली लावून घ्या आणि त्यानंतर कलर लावा. पेट्रोलियम जेलीवर कलर पडला तरी तो पाण्याने धुतल्यावर किंवा हाताने चोळल्यावर लगेच निघून जातो.
ऑलिव्ह ऑईल : ज्या लोकांची त्वचा अधिक संवेदनशील असते, अशा लोकांसाठी ऑलिव्ह ऑईल लावण्याचा पर्याय उत्तम ठरतो. ऑलिव्ह ऑईल हाताच्या बोटांनी हेअर लाईन भागात लावावे आणि तिथे हलक्या हाताने थोडी मालिश देखील करावी. कानाच्या मागे आणि मानेवरही अनेक जणांकडून हेअर कलर लागला जातो. तिथे देखील ऑलिव्ह ऑईल लावून हलक्या हाताने मसाज करावे.
टुथपेस्ट: हेअर डायपूर्वी ऑलिव्ह ऑईल किंवा पेट्रोलियम जेली लावलं नसेल तर असे डाग लवकर निघत नाहीत. दोन- तीन दिवस ते तसेच राहतात. म्हणून असे डाग काढण्यासाठी त्यावर थोडी टुथपेस्ट लावा आणि हलक्या हाताने चोळा. एखादा मिनिट चोळल्यानंतर ती जागा लगेच धुवून टाका. कारण टुथपेस्ट तुमच्या त्वचेला सहन होते की नाही, हे जाणून घेण्यासाठी पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे. काही त्रास झाला नाही, तरच हा इलाज सगळ्या भागावर करा.
नेलपेंट रिमूवर : हेअर डायचे त्वचेवरील डाग घालवण्यासाठी नेल पेंट रिमूवर हा एक सोपा पर्याय आहे. थोडा कापूस घेऊन त्यावर नेलपेंट रिमूव्हरचे काही थेंब ओता आणि डाग लागलेल्या ठिकाणी लावा काही वेळाने हे डाग जाण्यास मदत होईल. पण हा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या त्वचेला नेलपेंट रिमूव्हरमुळे काही त्रास झाला नाही तरच हा उपाय करून पाहा.
मेकअप रिमूवर : त्वचेवरील डायचे डाग काढण्यासाठी मेकअप रिमूवरचा ही वापर करू शकता. मेकअप रिमूवरचे काही थेंब कापसाच्या बोळ्यावर घेऊन ते डाग लागलेल्या ठिकाणी लावावेत. त्यामुळे डाग निघण्यास मदत होते.