जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सर्वच व्यवसाय आणि मानवी जीवनावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. शारीरिक आरोग्याबरोबरच नागरिकांना मोठा आर्थिक फटका देखील बसला आहे. अनेक कंपन्या अजूनही सुरू झाल्या नसून कोरोनाच्या या संकटाचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांना देखील बसला आहे.
मात्र अर्थव्यवस्था आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता हे सुरू करणं महत्वाचं आहे. त्यामुळे काही देशांनी हळूहळू शाळा सुरू करायला सुरुवात केली आहे. भारतात 21 सप्टेंबरपासून 9 ते 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि कॉलेज सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या या परिस्थितीत भारताआधी ज्या देशांनी आपल्या शाळा सुरू केल्या तिथे शाळा सुरू करताना काय खबरदारी घेण्यात आली आहे, कशी व्यवस्था करण्यात आली आहे आणि शाळा सुरू केल्यानंतर तिथली कोरोना संक्रमणाची परिस्थिती कशी आहे, हे पाहुयात.
कोरोनाची सुरुवात ज्या शहरातून झाली त्या चीनमधील वुहान शहरात देखील नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. येथील जवळपास 2840 पेक्षा आधिक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जवळपास 14 लाख विद्यार्थी शिकत आहेत. तापमान तपासणी यंत्र आणि हँडवॉश सारख्या गोष्टींचा वापर करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत कोणतीही कमी सोडण्यात आलेली नाही.
युरोपमध्ये सर्वात जास्त कोरोना मृत्यूंची नोंद ब्रिटनमध्ये होती. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र शाळा सुरू व्हायला हव्यात असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. तिथं शाळा सुरू करताना मास्क लावणं बंधनकारक केलं नाही. त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शाळांना अधिकार देण्यात आले आहेत.
बेल्जियममध्ये पाच वर्षांपुढील विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तसंच ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत त्या ठिकाणावरील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास परवानगी दिलेली नाही. कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे.
फ्रान्समध्येदेखील जून महिन्यात अशाच प्रकारे शाळा आणि कॉलेज सुरू करण्यात आले होते. मात्र त्यानंतर तेथे कोरोनाचा फैलाव वेगाने झाला होता आणि मग शाळा बंद करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा शाळा सुरू करून तिथं 11 वर्षांपुढील विद्यार्थी आणि शिक्षकांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे.
युरोपमधील नॉर्वे या देशाने एप्रिल महिन्यातच आपल्या शाळा सुरू करण्याला परवानगी दिली होती. मात्र या शाळा सुरू करताना मोठ्या प्रमाणात सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे शाळांसाठी विविध गाईडलाईन्स देखील जारी करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर जर्मनी प्रमाणेच 'कोहोर्ट' मॉडेल देखील राबवलं होतं. मात्र शाळा सुरू झाल्यानंतर काही मोठ्या वयाच्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोना संक्रमण आढळलं होतं.
जर्मनीने दीर्घ कालावधीनंतर 7 ऑगस्ट रोजी आपल्या देशातील शाळा सुरू करायला परवानगी दिली होती. त्याचबरोबर सुरक्षेची देखील मोठ्या प्रमाणात काळजी घेण्यात येत होती. विद्यार्थी आणि शिक्षकांना मास्क बंधनकारक करण्यात आला. सोशलतच सोशल डिस्टन्सिंगचे नियमही घालून देण्यात आले.
स्कॉटलंडमध्ये देखील अशाचप्रकारे व्हेंटिलेशन आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम बनवण्यात आले आहेत. मागील 3 आठवड्यांपासून येथील शाळा सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची समस्या उद्बवलेली नाही. याठिकाणी असणाऱ्या थंड वातावरणामुळे विद्यार्थ्यांना ताप आला, त्याची तपासणी करण्याता आली पण त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत.
इस्राईलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मात्र सरकारने मे महिन्यात शाळा उघडण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात याला विरोध केला होता. तरीदेखील सरकारने या महिन्यात आणखी शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे.
रशियात शाळा सुरू करण्यात आल्या मात्र मास्क बंधनकारक करण्यात आलं नाही.