पावसाळ्यात वातावरणातली आर्द्रता आणि ओलावा वाढतो. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. अनेकांना त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात आपण आपल्या त्वचेची ज्या प्रकारे विशेष काळजी घेतो, त्याचप्रमाणे पावसाळ्यातही त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज असते. विशेषत: पायांची पावसाळ्यात जास्त देखभाल करण्याची गरज असते.
फंगल इन्फेक्शन : पावसाळ्यात पायाच्या नखांमध्ये फंगल इन्फेक्शनची समस्या उद्भवू शकते. पायांच्या नखांमध्ये संसर्ग टाळायचा असेल, तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
पाय कोरडे ठेवा : पावसाळ्यात कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी पाय ओले होतात. अशा स्थितीत जेव्हा-जेव्हा पाय ओले होतात तेव्हा ते व्यवस्थित कोरडे करा. नखांभोवती सतत पाणी राहिल्यास संसर्ग होऊ शकतो.
नखं स्वच्छ ठेवा : पावसाळ्यात नखं स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. नखं स्वच्छ असतील तर बुरशीजन्य संसर्गाचा धोका फार कमी होईल.
अँटिसेप्टिक वापरा : पावसाळ्यात अँटिसेप्टिकचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. असं न केल्यास पायावर बॅक्टेरिया वाढत राहतील आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.
बॅगचा वापर करा : बाहेरून घरी आल्यानंतर कोमट पाण्यात एक टी-बॅग टाका आणि त्यात पाय पाच मिनिटं बुडवून ठेवा. असं केल्याने पायांवर बॅक्टेरिया वाढणार नाहीत.
बेकिंग सोडा वापरा : कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि व्हिनेगार टाकून त्यात पाय बुडवून ठेवा. यामुळे पायांना खूप आराम मिळेल आणि इन्फेक्शनचा धोकाही राहणार नाही. पावसाळ्यात नखं पिवळीदेखील पडतात. अशा नखांवर उपाय म्हणून व्हाइट व्हिनेगारचा वापर करू शकता.
अँटी फंगल पावडर किंवा तेल वापरा : पाय कोरडे केल्यानंतर त्यावर अँटी फंगल पावडर लावा. असं केल्यानं संसर्गाचा धोका कमी होईल. रात्री झोपताना पायाच्या बोटांना बदाम तेलाने मालिश करूनही संसर्गाचा धोका कमी करता येतो.
काळजी घेऊनही पायांच्या नखाभोवतीची त्वचा लाल आणि सुजलेली दिसत असेल, खाज येत असेल घरगुती उपाय न करता तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. कारण, ही सर्व लक्षणं फंगल इन्फेक्शनची आहेत