पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशावेळी काहीतरी झणझणीत चमचमीत खाण्याची अनेकांची इच्छा असते. त्यात विदर्भातील मंडळी म्हटलं की मराठा पाटवडी आलीच. अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत तयार होते.
तिखट तर्रीच्या रस्स्यात ही स्पेशल मराठा पाटवडी अप्रतिम लागते. बेसनचा वापर करून आपण पाटवडी ही रेसिपी करू शकता. काहीतरी नवीन भाजी खाण्याची इच्छा असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करा. वर्धायेथील गृहिणी मीना शिंदे यांच्याकडून मराठा पाटवडीची खास रेसिपी जाणून घेऊयात.
कढईत 1-2 वाटी पाणी घेऊन त्याला उकळी आल्यावर बारीक चिरलेला लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, हळद, मीठ ऍड करावे. शिजल्यानंतर बेसन ऍड करा आणि ढवळत राहा. त्यात गाठी राहता कामा नये. बेसन चांगलं शिजलं पाहिजे.
त्यासाठी झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या. आता बेसन चांगलं शिजल्यानंतर गरम असतानाच पाण्याचा हात घेऊन तेल लावलेल्या ताटात थापून घ्या. त्याच्या वड्या पाडून घ्या आणि त्यावर खसखस, सुकं खोबरे किस, कोथिंबीरने सजवून घ्या. आता पाटवडी तयार आहे.
पाटवडीचा झणझणीत रस्सा कसा तयार करायचा ते आपण जाणून घेऊयात. त्यासाठी आपल्याला एक मोठा कांदा आणि खसखस थोड्याशा तेलात भाजून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे.
त्यानंतर गरम तेलात ती पेस्ट टाकून शिजवायचे आहे. त्यात रस्सा घट्ट येण्यासाठी मराठा मसाला, तिखट, हळद, मीठ इत्यादी ऍड करायचं आणि चांगलं शिजू द्यायचंय. त्यानंतर पाणी घालून छान उकळी येऊ द्यायची. त्यात सर्व्ह करताना पाटवडी टाकून सर्व्ह करायची. अशाप्रकारे टेस्टी झणझणीत, मसालेदार, तिखट अशी मराठा पाटवडी तयार होते. आपणही ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.