आपल्या स्टॉलवरील ही गर्दी कायम राहावी यासाठी चाट विक्रेते नवीन आयडिया करत आहेत. डोंबिवलीतील एका विक्रेत्यानं चक्क चॉकलेट लेज शेवपुरी सुरू केलीय. हा हटके पदार्थ तरुणांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे.
डोंबिवली पूर्वेच्या पेंढारकर कॉलेज रोडला तरुणाईची नेहमी गर्दी असते. या तरूणाईला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची दुकानं या भागात आहेत. पेंढारकर कॉलेज समोरच्या अमन भेळपुरी या स्टॉलवर ही चॉकलेट लेज शेवपुरी मिळते.
ओनियन अँड क्रीम लेजचे पाकीट फोडून त्यातील मोठे लेज प्लेट मध्ये ठेवायचे. त्यानंतर त्यात पॅटीस, तिखट चटणी, गोड चटणी , लसूण चटणी , कांदा, टोमॅटो , खिसलेला कोबी , चाट मसाला, मीठ, मसाल्याचे चार-पाच प्रकार यामध्ये एकत्र केले जातात.
या सर्वांवर चॉकलेट सॉस, शेव, कोबी, कांदा, टोमॅटो, खिसलेली कॅडबरी टाकून ही डिश तयार केली जाते. चवीला टेस्टी आणि दिसायला हटके असलेली ही चॉकलेट शेवपुरी डोंबिवलीकरांची अतिशय आवडती डिश आहे. एक प्लेट डिशची किंमत 50 रुपये आहे.
चॉकलेट लेज शेवपुरीप्रमाणेच कुरकरे रगडा हा येथील पदार्थही फेमस आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, टोमॅटो, कांदा, कोबी घालून ते एकत्र परातीमध्ये शिजवलं जातं. हे गरम मिश्रण एका प्लेटमध्ये ओतले जाते. त्यावर कुरकुरे टाकून ही प्लेट सजवली जाते.
लेज भेळ, बिंगो भेळ, कुरकुरे भेळ, ड्रायफ्रूट अमन भेळ असे वेगवेगळे प्रकार अमनकडे मिळतात. या सर्व पदार्थांसाठी मसाले घरीच बनवत असल्याची माहिती त्यांनी दिली.