सध्या देशात कोरोना लशीचा तुटवडा जाणवतो आहे. कोरोना लशीचा पहिला डोस मिळणं तर दूर दुसऱ्या डोससाठीही अनेक जण प्रतीक्षेत आहेत.
बहुतेक ठिकाणी तर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आलं आहे. 45 पेक्षा जास्त नागरिकांनाच लस दिली जाते आहे. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं आहे.
तरीसुद्धा याच वर्षात भारतातील सर्व नागरिकांना कोरोना लस मिळेल, असा दावा मोदी सरकारने केला आहे. यासाठी केंद्र सरकारने प्लॅनही तयार केला आहे.
ऑगस्ट ते डिसेंबर, 2021 या पाच महिन्यांच्या कालावधीत 216 कोटी डोसेसची निर्मिती होऊन ते उपलब्ध होतील, अशी माहिती, नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिली.
ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान 216 कोटी लशीचे डोस उपलब्ध होतील. जवळपास 130 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशासाठी या पाच महिन्यांत प्रत्येकासाठी लस उपलब्ध होईल. याचा अर्थ प्रत्येक नागरिकाला लस दिल्यानंंतर अतिरिक्त डोसही शिल्लक राहतील, असं ते म्हणाले.
भारतात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. सध्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि अॅस्ट्राझेनेका-सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस दिली जाते आहे.
सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध आहेत आणखी सहा कोरोना लशी उपलब्ध होणार आहेत.
गेल्या महिन्यात रशियाची स्पुतनिक V लसही भारतात आली आहे. पुढील आठवड्यात स्पुतनिक V लस उपलब्ध होईल अशी आशा आहे, असं पॉल म्हणाले.
अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डचे 75 कोटी डोस मिळतील.
हैदराबादमधील भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचे 55 कोटी डोस असतील.
Bio E sub unit vaccine चे 30 कोटी डोस उपलब्ध होतील.
अहमदाबादमधील झायडस कॅडीलाच्या कोरोना लशीचे 5 कोटी डोस असतील.
SII Novavax - अमेरिकेतील नोवोवॅक्ससह सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या लशीचे 20 कोटी डोस
Bharat Biotech intranasal - भारत बायोटेकच्या इंट्रानेझल म्हणजेच नाकावाटे घेतल्या जाणाऱ्या कोरोना लशीचे 10 कोटी डोस
Sputnik V - रशियाच्या स्पुतनिक V चे 15.6 कोटी डोस
Genova mRNA : या लशीचे 6 कोटी डोस