पावसाळ्यामध्ये आजारपणाचा धोका जास्त वाढलेला असतो. त्यामुळेच इम्युनिटी वाढवणारा आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.
आरोग्य तज्ज्ञांच्यामते पावसामध्ये हेल्दी राहण्यासाठी आपली प्रतिकारक्षमता चांगली असणं आवश्यक आहे आणि यासाठीच संतुलित आहारात असायला हवा. इतर ऋतूमध्ये चांगल्या वाटणाऱ्या पालेभाज्या न खाण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ देतात.
वर्षभर आपण पालेभाज्या खात असलो तरी, पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खाणं टाळा. आहार तज्ज्ञांच्यामते पावसाळ्यामध्ये वातावरण दमट झालेलं असतं. त्यामुळे किटाणू आणि जीवजंतू वाढलेले असतात. शिवाय हा काळ जीवजंतूंच्याही प्रजननाचा काळ असतो.
पालेभाज्यांमध्ये इतर ऋतूंपेक्षा जास्त प्रमाणामध्ये माती आणि चिखल देखील लागलेला असतो. जरी पालेभाज्या स्वच्छ धुवून घेतल्या तरी त्यावरचे जंतू निघून जातात असं नाही.
त्यामुळे पावसाळ्यात पालक,मेथी,शेपू सारख्या पालेभाज्या कोबी, फ्लॉवर यासारख्या इतर भाज्यादेखील खाणं टाळायला हवं.
पावसाळ्यामध्ये पाणी दूषित होतं. दूषित पाणी प्यायल्यामुळे पोटामध्ये इन्फेक्शन होतं.
त्यामुळे कॉलरा, टायफाईड सारखे खराब पाण्यामुळे होणारे आजार होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाणी उकळून प्यावं.
पाऊस पडायला लागला की बऱ्याच जणांना भजी, समोसे, वडापाव असे तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र, या तळलेल्या पदार्थांमुळे पोटात इन्फेक्शन होऊ शकतं.
तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोट फुगणं, गॅसेस वाढणं असे त्रास होतात.
पावसाळ्यामध्ये मेटाबॉलिजम कमी झालेलं असतं. त्यामुळे पदार्थांमधील पोषक घटकांचं शोषण करण्याची आणि अन्न पदार्थ पचवण्याची ताकद नसते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हलका आहार घ्यावा.