राजकारणात आल्यानंतर देशाचा पंतप्रधान होण्याचे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. त्यांच्या आयुष्यात तो दिवस यावा, जेव्हा त्यांना लाल किल्ल्याच्या तटबंदीवर तिरंगा फडकवण्याची संधी मिळेल. स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त त्यांना देशातील जनतेला संबोधित करता यावं. सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सलग 9व्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. कोणत्याही पंतप्रधानांसाठी हा खास प्रसंग असतो.(फोटो-न्यूज18)
स्वतंत्र भारताच्या इतिहासात दोन पंतप्रधान असे होऊन गेले. ज्यांना लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची संधी मिळाली नाही. गुलझारीलाल नंदा आणि चंद्रशेखर हे दोन पंतप्रधान आहेत ज्यांना पंतप्रधान असतानाही लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवता आला नाही.
गुलझारीलाल नंदा दोनदा पंतप्रधान झाले. त्यांनी 13-13 दिवस दोनदा देशाची सूत्रे हाती घेतली. ते पहिल्यांदा 27 मे ते 9 जून 1964 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. दुसऱ्यांदा 11 जानेवारी ते 24 जानेवारी 1966 या काळात ते पंतप्रधानांच्या खुर्चीवर विराजमान झाले. मात्र, त्यांच्या दोन्ही कार्यकाळात 15 ऑगस्ट आला नाही. त्यामुळे लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यास ते मुकले.
गुलझारी लाल नंदा यांना दोन वेळा काळजीवाहू पंतप्रधान बनवण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर ते पहिल्यांदा काळजीवाहू पंतप्रधान झाले. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर त्यांना दुसऱ्यांदा काळजीवाहू पंतप्रधान बनवण्यात आले. त्यांचा दोन्ही कार्यकाळ केवळ तेवढ्याच दिवसांचा राहिला जोपर्यंत काँग्रेसने दुसऱ्या काँग्रेस नेत्याची पंतप्रधान म्हणून निवड केली नाही.
चंद्रशेखर हे दुसरे पंतप्रधान होते ज्यांना लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याची संधी मिळाली नाही. चंद्रशेखर हे 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात ऑगस्ट महिना आला नाही. त्यामुळे ते देखील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवू शकले नाही.
लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवण्याचा विक्रम पंडित नेहरूंच्या नावावर आहे. जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 ते मे 1964 या कालावधीत सलग 17 वेळा तिरंगा फडकवला. दुसऱ्या क्रमांकावर इंदिरा गांधींचा क्रमांक येतो. त्यांनी आपल्या कार्यकाळात 16 वेळा तिरंगा फडकवला. मनमोहन सिंग यांनी लाल किल्ल्यावरून 10 वेळा ध्वजारोहण केले.
काँग्रेसेतर पंतप्रधानांमध्ये सर्वाधिक वेळा पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला आहे. यानंतर अटलबिहारी वाजपेयींनी हे काम 6 वेळा केले. अटलबिहारी वाजपेयींना पहिल्या टर्ममध्ये तिरंगा फडकवण्याची संधी मिळाली नाही. मात्र, दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी 6 वेळा तिरंगा फडकवला. 2014 पासून पीएम मोदी सतत लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवत आहेत.