गुरुवारचा दिवस TRP रेटिंगचा. टीआरपी मीटरमध्ये आज एका नव्या मालिकेला स्थान मिळालंय. पण पहिलं स्थान गेल्या वेळच्या मालिकेनंच अबाधित ठेवलंय.
दोन आठवड्यापूर्वी सुरू झालेली 'अग्गबाई सासूबाई'नं लगेचंच पहिल्या पाचात स्थान मिळवलं. यावेळी ही मालिका 5 नंबरवर आहे. तेजश्री प्रधानचे फॅन्स खूप आहेत आणि पुन्हा एकदा ती सूनबाई म्हणून मालिकेत झळकलीय. शिवाय निवेदिता सराफ, गिरीश ओक ही मोठी नावंही आहेत. सासूबाईंचं लग्न सून लावते ही संकल्पनाही वेगळी आहे. पुन्हा ही मालिका वेगानं पुढे जातेय.
गेल्या वेळी चौथ्या नंबरवर असलेली 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका याही वेळी त्याच नंबरवर आहे. सिद्धीच्या हातून जंजिरा किल्ला घेण्याचा शंभूराजांचा प्रयत्न प्रेक्षकांना खिळवून ठेवतोय.
प्रेक्षकांना चला हवा येऊ द्या शोचा शेलिब्रिटी पॅटर्न आवडतो. मालिकेतलेच आवडते कलाकार काॅमेडीचा कल्ला करतात. चला हवा येऊ द्या शो तिसऱ्या नंबरवर आहे.
टीआरपी रेटिंगमध्ये पहिल्या पाचात पुन्हा एकदा झी मराठीवरच्याच मालिका आहेत. अजूनही बिग बाॅस मराठीनं पहिल्या पाचात नंबर पटकावला नाहीय.
अनेक आठवडे नंबर वन असलेली माझ्या नवऱ्याची बायको गेल्या वेळी नंबर 2 वर घसरली होती. याही आठवड्यात ती तिथेच आहे. गुरू, राधिका, शनाया आणि सौमित्र यांचे वेगवेगळे किस्से सुरू आहेतच. पण अजून फार काही वेगळं पाहायला मिळत नाहीय. बऱ्याचदा प्रेक्षक सवय म्हणून एखादी मालिका पाहत असतात.
राणादामध्ये अजूनही प्रेक्षकांचा जीव रंगलाय. गेल्या वेळेप्रमाणे याही वेळी तुझ्यात जीव रंगला नंबर वनवर आहे. राणादाचा नुसता दिसण्यातला नाही तर वागण्यातला मेकओव्हर प्रेक्षकांना आवडतोय.